अमेरिका आणि दक्षिण कोरियापासून संभवणाऱ्या धोक्याला उत्तर कोरिया आण्विक क्षमता वाढवून सामर्थ्यप्रदर्शन करीत राहिल

- हुकूमशहा किम जाँग ऊन यांच्या भगिनींचा इशारा

प्योनगँग – दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक येऊल यांच्याबरोबरील चर्चेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी उत्तर कोरियाला इशारा दिला होता. अमेरिका किंवा अमेरिकेच्या सहकारी देशांवर अणुहल्ला चढविणारी राजवट शिल्लक राहणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बजावले होते. त्यावर उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग ऊन यांची भगिनी किम यो जाँग यांची प्रतिक्रिया आली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियापासून संभवणाऱ्या धोक्याविरोधात उत्तर कोरिया आपली आण्विक क्षमता वाढवून त्याचे प्रदर्शन देखील करीत राहिल, असे किम यो जाँग यांनी धमकावले आहे.

आण्विक क्षमता२०२२ सालापासून आत्तापर्यंत उत्तर कोरियाने शंभर क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. यामध्ये बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे. याबरोबरच उत्तर कोरियाने अणुचाचणीची तयारी केल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळे दक्षिण कोरिया अधिकच असुरक्षित बनल्याचे दावे करण्यात येत होते. तसेच अमेरिकेचा सहकारी देश असलेल्या दक्षिण कोरियाच्या सुरक्षेसाठी बायडेन प्रशासन पुरेशा हालचाली करीत नसल्याची जोरदार टीका अमेरिकेत सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक येऊल यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. यावेळी दक्षिण कोरियाच्या सुरक्षेसाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी उत्तर कोरियाला इशाराही दिला होता.

आण्विक क्षमताअमेरिका किंवा अमेरिकेच्या सहकारी देशांवर अणुहल्ला चढविणारी राजवट शिल्लक राहणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले होते. यानंतर उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग ऊन यांची भगिनी किम यो जाँग यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची खिल्ली उडविली होती. वयोवृद्ध बनललेया बायडेन यांची ही विधाने गैरसमजुतीवर आधारलेली असली, तरी त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे किम यो जाँग म्हणाल्या. अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्यातील सहकार्य उत्तर कोरियाच्या विरोधातच असल्याचा ठपका किम यो जाँग यांनी ठेवला. तसेच या धोक्याला उत्तर कोरिया आपली आण्विक क्षमता वाढवून प्रत्युत्तर देईल, असे त्यांनी बजावले आहे.

आण्विक क्षमताज्या प्रमाणात अमेरिका व दक्षिण कोरियापासून संभवणारा धोका वाढेल, अगदी त्याच प्रमाणात उत्तर कोरिया आपली क्षमता वाढवित नेईल आणि त्याचे तितकेच आक्रमक प्रदर्शन देखील करील, असे किम यो जाँग यांनी धमकावले. याआधीही उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासह अमेरिका व जपानवर हल्ले चढविण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. मात्र अलिकडच्या काळात उत्तर कोरियाच्या आक्रमकतेत झालेली वाढ लक्षणीय ठरते, असा इशारा सामरिक विश्लेषक देत आहेत.

अमेरिकेसारख्या महासत्तेचीही पर्वा न करता उत्तर कोरिया क्षेपणास्त्र चाचण्यांद्वारे कोरियन क्षेत्रात तणाव माजवित आहे. अशा बेताल देशापासून दक्षिण कोरियाची सुरक्षा करण्यासाठी इथे अण्वस्त्रे तैनात करण्याची मागणी सुरू झाली आहे. तसेच अमेरिकेच्या अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या दक्षिण कोरियाच्या नौदलतळांवर तैनात करण्यावरही राष्ट्राध्यक्ष बायडेन व दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा झाली होती. याबरोबरच अमेरिका व दक्षिण कोरियाच्या युद्धसरावांमध्ये वाढ करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आल्याची चर्चा आहे. यामुळे उत्तर कोरिया अस्वस्थ बनला असून अमेरिका व दक्षिण कोरियाच्या या आघाडीविरोधात आपण अधिक आक्रमक प्रदर्शन करणार असल्याचे इशारे उत्तर कोरियाने दिले आहेत.

leave a reply