नव्या क्षेपणास्त्र चाचण्यांनंतर उत्तर कोरियाच्या किम जाँग-उन यांच्याकडून आण्विक क्षमता वाढविण्याची घोषणा

kim-jong-unप्योनग्यँग – शनिवारी तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करणाऱ्या उत्तर कोरियाने नव्या वर्षात आपले आण्विक धोरण अधिक आक्रमक करण्याचे संकेत दिले. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग-उन यांनी रविवारी अमेरिका व उत्तर कोरियावर टीकेची झोड उठवित नवे आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकसित करण्याचे तसेच अण्वस्त्रांच्या साठ्यात भर टाकण्याची घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाची पाच ड्रोन्स दक्षिण कोरियात घुसली होती. त्यापाठोपाठ नव्या क्षेपणास्त्र चाचण्या व किम जाँग-उन यांच्या वक्तव्यामुळे या क्षेत्रातील तणाव अधिकच वाढल्याचे दिसत आहे.

शनिवारी दक्षिण कोरियाने लघु पल्ल्याच्या तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या. सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान करण्यात आलेल्या या चाचण्यांमधील क्षेपणास्त्रांनी 300 ते 350 किलोमीटर्सचा पल्ला गाठल्याचे सांगण्यात येते. तिन्ही क्षेपणास्त्रे ‘सी ऑफ जपान’च्या हद्दीत कोसळल्याची माहिती जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. दक्षिण कोरियानेही या चाचण्यांना दुजोरा दिला असून संरक्षणदले हाय अलर्टवर असल्याचे बजावले आहे.

SKOREA-NKOREA-MISSILE2022 सालात उत्तर कोरियाने 90 हून अधिक बॅलेस्टिक तसेच मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन या क्षेत्रात तणाव निर्माण केला होता. उत्तर कोरियाच्या या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियाने अमेरिकेच्या सहाय्याने युद्धसरावांची तीव्रता वाढविली होती. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल यांनी अधिक आक्रमक भूमिका स्वीकारल्याचा दावा केला जात होता. मात्र ड्रोन्सची घुसखोरी व त्यापाठोपाठ तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या यामुळे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष येओल अडचणीत आल्याचे दिसत आहे.

दुसऱ्या बाजूला उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग-उन यांनी आपला अण्वस्त्र कार्यक्रम अधिकच विस्तारण्याचे संकेत दिले आहेत. शनिवारी झालेल्या चाचण्यांनंतर किम जाँग यांनी सत्ताधारी पक्षाची बैठक घेतली. त्यात त्यांनी अमेरिका व दक्षिण कोरियाच्या चिथावणीखोर कारवायांवर टीकास्त्र सोडले. या कारवायांमुळे उत्तर कोरियाला आपली संरक्षणक्षमता अधिक वाढविणे गरजेचे ठरते, असा दावा उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग-उन यांनी केला. नव्या वर्षात उत्तर कोरिया आपल्या अण्वस्त्रांच्या संख्येत भर टाकेल, असे त्यांनी बजावले. उत्तर कोरिया नवे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित करणार असून ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’चे उत्पादन वाढविणार असल्याचा दावाही किम जाँग-उन यांनी केला.

leave a reply