यावर्षी जागतिक अर्थव्यवस्थेच्या एक तृतियांश भागाला मंदीचा फटका बसेल

- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा इशारा

मंदीचा फटकावॉशिंग्टन – जागतिक अर्थव्यवस्थेच्या एक तृतियांश भागाला यावर्षी आर्थिक मंदीचा फटका बसेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तालिना जॉर्जिव्हा यांनी दिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अधिक खडतर ठरेल, असेही जॉर्जिव्हा यांनी यावेळी बजावले. अमेरिका, युरोपिय महासंघ व चीनच्या अर्थव्यवस्था मंदावतील याकडेही नाणेनिधीच्या प्रमुखांनी लक्ष वेधले. रशिया-युक्रेन युद्ध, चीनमधील कोरोनाची साथ व मध्यवर्ती बँकाकडून वाढविण्यात येणारे व्याजदर हे घटक मंदीसाठी कारणीभूत ठरत असल्याचेही जॉर्जिव्हा यांनी सांगितले.

मंदीचा फटकागेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासगट, वित्तसंस्था, अर्थतज्ज्ञ तसेच विश्लेषक सातत्याने जागतिक मंदीच्या धोक्याकडे लक्ष वेधत आहेत. 2019 साली चीनमध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीनंतर 2020 साली जगातील अनेक अर्थव्यवस्थांना मंदीला तोंड द्यावे लागले होते. त्यानंतर 2021 साली जागतिक अर्थव्यवस्था हळुहळू पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र गेल्या वर्षी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतर सर्व आर्थिक समीकरणे कोलमडल्याचे दिसत आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनाचे दर कडाडले असून जागतिक पुरवठा साखळीही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बहुतांश देशांमध्ये महागाईचा भडका उडाला असून सामान्य जनतेला ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’ला तोंड द्यावे लागत आहे. त्याचवेळी महागाई कमी करण्यासाठी जगातील सर्वच मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढ करण्याचे धोरण राबविले आहे. त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसत असून अनेक क्षेत्रातील मागणी घटल्याचे समोर आले आहे.

मंदीचा फटकागेल्या महिन्यापासून चीनमध्ये पुन्हा कोरोनाची नवी लाट आली असून जवळपास 25 कोटींहून अधिक रुग्ण आढळले आहेत. चीनमधील या नव्या लाटेने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नाणेनिधीच्या प्रमुखांनीही त्याचा उल्लेख केला. पुढील तीन ते सहा महिने चीनमध्ये कोरोनाच्या साथीचा भडका उडालेला असेल, असा इशारा जॉर्जिव्हा यांनी दिला.

‘पुढील काही महिने चीनसाठी अत्यंत खडतर काळ असणार आहे. चीनमधील आर्थिक विकास नकारात्मक राहिल व त्याचे विपरित परिणाम आशिया खंड आणि त्याबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थेवरही होतील’, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तालिना जॉर्जिव्हा यांनी बजावले. गेल्या चार दशकांमध्ये पहिल्यांदाच चीनचा आर्थिक विकास दर जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासदरापेक्षा खाली असेल, असेही जॉर्जिव्हा यांनी सांगितले.

जागतिक अर्थव्यवस्थेतील एक तृतियांश भागाला मंदीचा फटका बसेल व मंदीत नसलेल्या देशांनाही या वातावरणाचा फटका बसू शकतो, असा दावा नाणेनिधीच्या प्रमुखांनी केला. नाणेनिधीच्या अहवालात जागतिक मंदीची शक्यता नाकारण्यात आली असली तरी त्याचा धोका पूर्णपणे नाकारता येणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

leave a reply