कुख्यात गँगस्टर विकास दुबेची उज्जैनमध्ये धरपकड

लखनऊ – उत्तर प्रदेशमध्ये पोलीस उपाअधीक्षकासह आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गँगस्टर विकास दुबेला अखेर मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये अटक करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून विकास दुबे पोलिसांना गुंगारा देत होता.

Gangster-Ujjainगेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये विकास दुबे व त्याच्या टोळीतील गुंडानी त्याला अटक करण्यासाठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला झाला होता. दुबे आणि त्याच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्यात आठ पोलीस शहीद झाले. तर सात जण जखमी झाले होते. या घटनेनंतर विकास दुबेला पकडण्यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होते. त्याची माहिती देणाऱ्यांनासाठी इनामाची देखील घोषणा करण्यात आली होती. अखेर गुरुवारी उज्जैनच्या महाकाल मंदिरातून त्याला अटक करण्यात आली.

मंदिरातील सुरक्षारक्षकाने त्याला ओळखले व त्याची माहिती पोलिसांना दिल्याचे सांगण्यात येते. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी देखील विकास दुबेच्या अटकेला दुजोरा दिला आहे. दुबेला अटक कशी झाली याबाबत तुर्तास काही सांगणे योग्य नाही. त्याने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या, असे मिश्रा यांनी म्हटले. सध्या विकास दुबेच्या अटकेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. घाबरलेल्या विकास दुबेने आत्मसमर्पण केल्याच्याही बातम्या येत आहेत.

Gangster-Ujjain३ जुलै रोजी पोलीस पथकावर हल्ला करून फरार झालेल्या दुबेचा शोध तीन राज्यांचे पोलीस घेत होते. दुबेसह त्याचे दोन साथीदार बिट्टू आणि सुरेश या दोघांना देखील अटक करण्यात आली आहे. तसेच गुरुवारी उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या कारवाईत त्याच्या दोन साथीदारांना ठार करण्यात आले आहे. दुबे उत्तर प्रदेशमधून मध्य प्रदेशला कसा पोहोचला हे अद्याप समजू शकलेले नाही. त्याला काही जणांकडन मदत करण्यात येत होती, अशी माहिती समोर येत आहे. तो बऱ्याच जणांशी मोबाईलवरुन संपर्कात होता. एखाद्याला फोन केल्यानंतर तो मोबाईल बंद करत असे व जागा देखील बदल होता असे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे.

२००० साली कानपूरच्या ताराचंद इंटर कॉलेजचे सहायक व्यवस्थापक सिद्धेश्वर पांड्ये यांच्या हत्येप्रकरणी विकास दुबेच नाव पहिल्यांदा समोर आले होते. त्याचवर्षी रामबाबू यादवच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर होता. तुरुंगात बसून त्याने कट रचला होता. त्यानंतर २००४ मधील केबल व्यावसायिकाची हत्याप्रकरणी देखील त्याचे नाव समोर आले होते. विकास दुबेविरोधात तब्बल ६० गंभीर गुन्हे दाखल आहेत. विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

leave a reply