गलवान संघर्षातून भारताने चीनला ‘संदेश’ दिला

-भारताचे माजी राजदूत गौतम बंबावले

नवी दिल्ली – चीन महाशक्ती आहे, हे मुकाट्याने मान्य करुन भारताने चीनच्या जरबेत रहावे, यासाठी हा देशाने प्रयत्न करुन पाहिला. पण चीनच्या या प्रयत्नांना भारत भीक घालत नसल्याचे लडाखच्या घटनेने दाखवून दिले आहे. या एका घटनेने भारतीय सैन्याने चीनच्या लष्कराला फार मोठा संदेश दिला आहे, असे भारताचे चीनमधील माजी राजदूत गौतम बंबावले यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बंबावले यांनी भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या सीमावादावरील आपली मते परखडपणे मांडली.

भारत आणि चीनच्या संस्कृतीमध्ये असलेला फरक बंबावले यांनी या मुलाखतीत लक्षात आणून दिला. दोन्ही देशांच्या संस्कृती प्राचीन आहेत. पण भारतीय संस्कृती ‘वसुदैव ककुटुंबकम्’ अर्थात सारे विश्व आपले कुटुंब असल्याचे मानते. तर चिनी संस्कृती ‘चुंग वो’ अर्थात चीनच साऱ्या विश्वाचे केंद्र असल्याचे मानून बाकीच्या क्षेत्राला दुय्यम स्थान देते. इतरांना कनिष्ठ मानणारा हा सांस्कृतिक वारसाच चीनच्या आक्रमकतेमागील प्रमुख आधार असल्याचा दावा राजदूत गौतम बंबावले यांनी केला.

गलवान संघर्षातून भारताने चीनला ‘संदेश’ दिलालडाखमधील चीनची सैन्यतैनाती ही एका रात्रीत झालेली नाही. हा एक पूर्वनियोजित कट होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या लष्कराने आपल्या हद्दीत मोठा युद्धसराव आयोजित केला होता. हा युद्धसराव सुरू असताना चीनने अचानक सारे लष्कर लडाखच्या सीमेकडे वळविले, असे सांगून बंबावले यांनी चीनच्या या कारवायांकडे लक्ष्य वेधले. लडाखमधली लष्करी तैनाती व गलवान व्हॅलीचा कट चीनने आधीच आखला होता. गलवान व्हॅलीतील हल्ल्यातून चीनला डावपेच आणि धोरणात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर काही गोष्टी साधायच्या होत्या, असा आरोप भारताच्या माजी राजदूतांनी केला.

मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात करून येथील सीमारेषा आपणच निश्चित करण्याचा चीनचा डाव होता. पण भारतीय सैन्याने चीनचा हा डाव उधळून लावला आणि चीनचा लष्कराला फार मोठा संदेश दिला. चीन महाशक्ती आहे, हे भारताने मुकाट्याने मान्य करावे, यासाठी चीनने लष्करी दबाव टाकण्याची ही खेळी केली होती. मात्र, आपण चीनची पर्वा करीत नाही, हे गलवान व्हॅलीतील संघर्षाद्वारे भारताने दाखवून दिले आहे. असे करुन भारताने चीनला आपल्या शर्थींवर चर्चा करण्यास भाग पाडले आणि चीनचा डाव हाणून पाडला, असे बंबावले यांनी म्हटले आहे.

गलवान व्हॅलीतील संघर्षात चीनचे नक्की किती जवान मारले गेले, यावर बरीच चर्चा होऊ शकते. पण इथे मारल्या गेलेल्या चिनी जवानांच्या संख्येपेक्षाही गेल्या चार दशकात पहिल्यांदाच चीनला प्रत्यक्ष संघर्षात जीवितहानी सोसावी लागली, ही बाब सर्वात महत्त्वाची ठरते. याद्वारे भारताच्या सैन्याने चीनच्या लष्कराला दिलेला संदेश म्हणूनच सर्वात महत्त्वाचा ठरतो, असे सांगून बंबावले यांनी पुढच्या काळात चीन भारताला गृहित धरु शकणार नाही, असे संकेत बंबावले यांनी दिले आहेत.

leave a reply