अरुणाचल प्रदेशमध्ये सुरक्षादलांच्या कारवाईत ‘एनएससीएन’चा अतिरेकी ठार

तेजपूर – अरुणाचल प्रदेशमध्ये म्यानमार सीमेजवळ करण्यात आलेल्या कारवाईत ‘नॅशनल सोशालिस्ट काऊंसिल ऑफ नागालँड’ (एनएससीएन- के) (वाय- ए) या संघटनेचा अतिरेकी ठार झाला. या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यांमध्ये चिनी बनावटीची शस्त्रे आढळली आहेत. याआधीही ईशान्येकडील बंडखोर संघटनांना चीन सहाय्य करीत असल्याचे उघड झाले होते.

'एनएससीएन'

म्यानमार सीमेजवळ अरुणाचल प्रदेशमधील वाक्का इथे ‘एनएससीएन’चे अतिरेकी तळ ठोकून असल्याची खबर गुप्तचर यंत्रणांना मिळाली. तातडीने ‘आसाम रायफल्स’ आणि आसाम पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली. घटनास्थळी सुरक्षादलांना ‘एनएससीएन’चे अतिरेकी आढळले. सुरक्षादलाने त्यांना शरण येण्यास सांगितले. पण अतिरेक्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार सुरु केला.

सुरक्षादलांना एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले. त्याची ओळख पटली असून हा अतिरेकी ‘एनएससीएन-के'( वाय-ए)चा कॅडेर होता. ‘गांजोम वांसा’ असे त्याचे नाव होते, असे पोलिसांनी सांगितले. सुरक्षा दलाने त्याचा मृतदेह कुटुंबाकडे सोपविला. तसेच घटनास्थळावरुन पोलिसांनी पिस्तूल्स, गन्स, मॅगक्झिन आणि चिनी बनावटीचे हॅण्डग्रेनेड जप्त केले.

leave a reply