आसाम आणि मिझोरामच्या सीमेवर दोन गटांमध्ये हिंसाचार

नवी दिल्ली – शनिवारी रात्री आसाम आणि मिझोरामच्या सीमेवर दोन गटांमध्ये भडकलेल्या हिंसाचारात सात हून अधिक जण जखमी झाले. तसेच काही घरे आणि दुकाने जळून खाक झाली. यानंतर सीमाभागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. आता परिस्थिती नियंत्रणात आली असून त्या भागात जवानांची अतिरिक्त तैनाती करण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली.

आसाम आणि मिझोरामच्या सीमेवर दोन गटांमध्ये हिंसाचारआसामच्या काचर आणि मिझोरामच्या कोलासिब जिल्ह्यातल्या सीमेवर दोन गटांमध्ये हिंसाचार भडकला. मिझोरामच्या कोलासिबमधील ‘वेरनगट्टे’गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील सीमाभागात तात्पुरती बांबूची घरे आणि दुकाने उभारण्यात आली होती. तसेच चेकपोस्टस उभारण्यात आले होते. कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी हे बांधकाम केले गेले होते,असे सांगण्यात येते. या बांधकामावरुन आसाम आणि मिझोराममधल्या सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांच्या गटांमध्ये हिंसाचार भडकला.

यामुळे काही काळ या भागात तणाव निर्माण झाला होता. आसाम आणि मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांमध्ये तणावावर चर्चा झाली. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शांततेचे आवाहन केले. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आता परिस्थिती नियंत्रणात आली असून ‘इंडियन रिझर्व्ह बटालियन’ला तैनात करण्यात आले आहे.

आसाम आणि मिझोरामच्या सीमेवर दोन गटांमध्ये हिंसाचारआसाम-मिझोरामच्या सीमेवर ८० टक्के अवैध बांगलादेशी वास्तव्य करुन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे देखील या वादाचे कारण असल्याचे सांगितले जाते. आसाम आणि मिझोरामची सीमारेषा १६४.६ किलोमीटरमध्ये विभागली गेली आहे. १९७२ सालापर्यंत मिझोराम आसामचा भाग होता.त्यानंतर मिझोराम स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनले. १९८७ साली मिझोराम राज्य बनले. तेव्हापासून या दोन्ही राज्यांमधला सीमावाद धगधगत आहे. रविवारी पेटलेल्या हिंसाचारामागे ईशान्येकडील बंडखोर संघटना असल्याचे सांगितले जाते. त्यांना या भागाचा विकास नको असून इथे अस्थैर्य निर्माण करायचे असल्याचे दावे केले जातात.

दरम्यान, गेल्या आठवड्यात आसामच्या गुवाहाटीमध्ये काही भागात दोन महिन्यांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली होती. गुवाहाटीमधील रहिवासी भागात दहशतवादी सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी लपून बसले आहेत, असा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी आसामच्या पोलिसांना दिला. त्यानंतर सतर्क झालेल्या गुवाहाटी पोलिसांनी शहरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेतला.

leave a reply