इराणबरोबरील अणुकरारामुळे आखातात शेकडोंचा बळी गेला

- इस्रायल भेटीत बाहरिनच्या राजनैतिक अधिकार्‍यांची जळजळीत टीका

शेकडोंचा बळीजेरूसलेम – ‘इराणबरोबरच्या अणुकरारानंतर आखातात सर्वत्र शांती प्रस्थापित होईल. इराण तसेच आखातासाठी नवा अध्याय सुरू होईल, असे आम्हाला वाटत होते. पण झाले भलतेच. या अणुकरारानंतर आखातातील संकटांना अधिक इंधन मिळाले. संबंधित करारानंतरच अतिरेकी प्रवृत्तींना बळ मिळाले आणि या क्षेत्रातील वैर वाढले. यामुळे शेकडोंचा बळी गेला आणि आखातातील संघर्षामुळे युरोपात धाव घेणार्‍या निर्वासितांची संख्या वाढली. तेव्हा या अणुकरारामुळे आखाताचे काहीही भले झालेले नाही’, अशी जळजळीत टीका बाहरिनचे राजनैतिक अधिकारी शेख अब्दुल्ला बिन अहमद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांनी केली.

बाहरिनच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांचे उपसचिव असलेलल्या शेख अब्दुल्ला खलिफा यांनी रविवारी इस्रायलला भेट दिली. गेल्या वर्षी इस्रायल आणि बाहरिनमध्ये पार पडलेल्या अब्राहम कराराच्या पार्श्‍वभूमीवर, उभय देशांमधील सहकार्य वाढविण्यासाठी शेख अब्दुल्ला खलिफा दौर्‍यावर होते. यावेळी बाहरिनच्या राजनैतिक अधिकार्‍यांनी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयसॅक हर्झोग यांची भेट घेतली. त्याचबरोबर इस्रायली लष्कराच्या ऑपरेशन्स कमांडचे प्रमुखांशी चर्चा केली. याआधी शेख अब्दुल्ला खलिफा यांनी माध्यमांशी बोलताना अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांनी २०१५ साली इराणबरोबर केलेल्या अणुकरारावर ताशेरे ओढले.

सहा वर्षांपूर्वीच्या या कराराने आखातात अधिकच संकटे आणि अराजक निर्माण केले, असा आरोप बाहरिनच्या राजनैतिक अधिकार्‍यांनी केला. ‘इराणने नेहमीच या क्षेत्रातील देशांच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ केलेली आहे. बाहरिनमधील इराणचा हस्तक्षेप नवी बाब ठरत नाही’, शेख अब्दुल्ला खलिफा म्हणाले. ‘या अणुकरारामुळे आखातातील शेकडो निष्पाप जनता, सुरक्षा रक्षकांचा बळी गेला तर कित्येक जखमी झाले’, अशी खंत शेख अब्दुल्ला खलिफा यांनी व्यक्त केली.

‘आखातातील प्रत्येक संघर्षामागे इराण आणि इराणसंलग्न संघटनांचा हात आहे. इराणला स्थीर, सुरक्षित, समृद्ध आणि जबाबदार पाहणे बाहरिनलाही आवडेल. पण तसे अजिबात दिसत नाही. २०१५ सालच्या अणुकरारात फक्त अण्वस्त्रनिर्मिती थांबविण्याला महत्त्व दिले. पण या क्षेत्राला भेडसावत असणार्‍या इतर समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामध्ये इराणच्या क्षेपणास्त्रनिर्मितीचा कार्यक्रम व त्यापासून आखाती देशांना असणारा धोका याचाही समावेश आहे’, असा ठपका बाहरिनच्या राजनैतिक अधिकार्‍यांनी यावेळी ठेवला. ‘इराण हा कट्टरवाद, दहशतवाद यांचा समर्थक आहे. तसेच अवैध शस्त्रास्त्रे, स्फोटके, अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेला आहे’, असे ताशेरे शेख अब्दुल्ला खलिफा यांनी ओढले. या आरोपांमुळे शेख अब्दुल्ला खलिफा यांची इस्रायलभेट बाहरिन-इराण संबंधांसाठी वादळी ठरणार असल्याचे दिसते.

बाहरिनच्या राजनैतिक अधिकार्‍यांनी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री लॅपिड यांची भेट घेतली. गेल्या वर्षी अमेरिकेच्या मध्यस्थीने पार पडलेल्या अब्राहम करारानंतर बाहरिनच्या अधिकार्‍यांनी इस्रायलला भेट देण्याची ही तिसरी वेळ. १५ सप्टेंबर रोजी सदर कराराला एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने बाहरिनने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे बायडेन प्रशासन इराणबरोबर नव्याने अणुकरारासाठी प्रयत्न करीत असताना बाहरिनने याबाबत दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो. इस्रायल देखील अमेरिकेसह पाश्‍चिमात्य देशांना इराणबरोबरील अणुकरारावरून अशाच स्वरुपाचा इशारा देत आहे.

leave a reply