दशकभरात आण्विक क्षेपणास्त्रे आणि बॉम्बचे मार्केट ७३ टक्क्यांनी वाढेल

- अमेरिकास्थित अभ्यासगटाचा इशारा

पोर्टलँड – ‘रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील प्रमुख देशांनी आपला लष्करी खर्च वाढविण्याचा सपाटा लावला असून यामुळे जागतिक शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेत मोठा बदल संभवतो. या युद्धामुळे २०३० सालापर्यंत जगभरातील आण्विक क्षेपणास्त्रे आणि बॉम्बची बाजारपेठ ७३ टक्क्यांनी वाढेल. पुढील दशकभरात आण्विक क्षेपणास्त्रे आणि बॉम्बचे मार्केट तब्बल १२६ अब्ज डॉलर्सवर जाईल’, असा इशारा अमेरिकास्थित अभ्यासगटाने दिला.

बॉम्बचे मार्केट२०२० साली कोरोनाने थैमान घालण्याआधी जगभरातील आण्विक क्षेपणास्त्रे आणि बॉम्बची बाजारपेठ जवळपास ७३ अब्ज डॉलर्स इतकी होती. पण कोरोनाच्या फैलावानंतर जगभरातील बहुतांश देशांनी आपल्या संरक्षणखर्चात कपात करून आरोग्यसुविधांवर लक्ष केंद्रीत केले होते. याचा थेट गंभीर परिणाम संरक्षण क्षेत्रावर झाला होता. पण आता परिस्थिती बदलत असून भूराजकीय संघर्ष यामुळे जगभरातील जवळपास प्रत्येक देश आपल्या संरक्षणखर्चात वाढ करण्याकडे लक्ष केंद्रीत करीत असल्याचा दावा ‘अलायड् मार्केट रिसर्च’ या अभ्यासगटाने केला.

येत्या दशकभरात, २०३० सालापर्यंत आण्विक क्षेपणास्त्रे आणि बॉम्बची जागतिक बाजारपेठ १२६ अब्ज डॉलर्सनी वाढेल, याकडे सदर अभ्यासगटाने लक्ष वेधले. यातही लढाऊ विमाने किंवा जमिनीवरुन मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांमध्ये मोडणार्‍या आण्विक स्फोटकांची मागणी वाढेल, असा दावा या अभ्यासगटाने आपल्या अहवालात केला. २०२० साली पाणबुडीतून प्रक्षेपित केल्या जाणार्‍या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या संख्येत एक चतुर्थांश वाढ झाल्याची आठवण या अहवालात करून देण्यात आली.

तसेच आत्तापर्यंत अमेरिका आणि कॅनडा या देशांचे आण्विक क्षेपणास्त्र आणि बॉम्बची अर्ध्याहून अधिक प्रमाणात बाजारपेठेवर वर्चस्व होते. पण येत्या दशकभरात या आघाडीवर आशिया-पॅसिफिक क्षेत्र अमेरिका व कॅनडावर मात करील, असा इशारा या अभ्यासगटाने दिला. भारत, चीन आणि पाकिस्तान आपापली आण्विक क्षमता वाढवतील, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. काही आंतरराष्ट्रीय नियम, कायदे अणुचाचणीला परावृत्त करतात, असे अमेरिकास्थित अभ्यासगटाने म्हटले आहे.

गेल्या ४० दिवसांपासून रशिया व युक्रेनमध्ये भडकलेल्या युद्धामुळे अमेरिका, युरोपसह इतर देशांनी आपल्या संरक्षणखर्चात वाढ केली आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गेल्या आठवड्यात सादर केलेल्या विक्रमी संरक्षणखर्चाचा हवाला या अभ्यासगटाने दिला. बायडेन यांनी न्यूक्लिअर ट्रायड अर्थात पाणबुडी, बॉम्बर विमाने आणि जमिनीवरुन मारा करणार्‍या आण्विक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या आधुनिकीकरणाला भर दिल्याची आठवण या अभ्यासगटाने करुन दिली.

leave a reply