रोम – अणुकरारातील वाटाघाटींबाबत इराणने स्वीकारलेली ताठर भूमिका आणि गेल्या आठवड्यात सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिका आक्रमक बनली आहे. अमेरिकेच्या हितसंबंधांना ड्रोन हल्ल्यांद्वारे लक्ष्य करणार्या इराणला त्याचे योग्य ते प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला. नोव्हेंबरमध्ये इराण अणुकराराच्या वाटाघाटीत सहभागी झाला नाही तर लष्करी कारवाईचा विचारही केला जाऊ शकतो, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी बजावले आहे. सत्तेवर आल्यापासून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इराणबाबत स्वीकारलेल्या उदार धोरणाची पार्श्वभूमी लक्षात घेता, त्यांच्या भूमिकेत झालेला हा आक्रमक बदल लक्ष वेधून घेणारा ठरतो.
रविवारी इटलीमध्ये पार पडलेल्या जी२०च्या बैठकीनंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी माध्यमांशी चर्चा केली. यावेळी बायडेन यांनी सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यावर जोरदार टीका केली. इराण करीत असलेल्या ड्रोन हल्ल्यांना उत्तर देणार का? या प्रश्नावर बोलताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिका इराणला उत्तर देणार असल्याचे सांगितले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणविरोधात केलेले विधान इस्रायली माध्यमांनी उचलून धरले.
तर इराणबरोबर सुरू केलेल्या अणुकराराबाबत बोलताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला खडसावले. ‘पुढच्या महिन्यात व्हिएन्ना येथे नव्याने सुरू होणार्या अणुकरारासंबंधीच्या चर्चेत सहभाग घेणार्या इराणच्या भूमिकेवर सारे काही अवलंबून आहे. जर इराणने सदर चर्चेतून माघार घेतली तर त्यांना त्याची आर्थिक किंमत चुकवावी लागेल’, असा इशारा राष्ट्राध्यक्ष बायेन यांनी दिला. तर अमेरिकी राष्ट्राध्यक्षांबरोबर असलेले परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी अणुकराराबाबतच्या चर्चेवर अमेरिका आशावादी असल्याचे सांगितले.
पण नोव्हेंबर महिन्यातील चर्चेत इराण वेळीच सहभागी झाला नाही तर इतर पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो, असे ब्लिंकन यांनी बजावले आहे. अमेरिका कोणत्या इतर पर्यायांबाबत बोलत आहे, या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी लष्करी कारवाईचा पर्यायही समोर असल्याचे स्पष्ट केले.
अमेरिकेच्या या आक्रमक भूमिकेवर इराणमधून प्रतिक्रिया आली आहे. अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी अमेरिकेकडे इच्छाशक्ती नसल्याचा आरोप इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर अब्दोल्लानियान यांनी केला. राष्ट्राध्यक्ष बायडेन माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे विरोधक म्हणून दाखवित असले तरी त्यांनीही इराणवर निर्बंध कायम ठेवून इराणला यातून सवलत दिलेली नाही, अशी टीका अब्दोल्लानियान यांनी केली. अमेरिकेने भूमिकेत बदल केला तर अणुकरार शक्य असल्याचा दावा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला.
दरम्यान, नोव्हेंबरच्या अखेरीस व्हिएन्ना येथील वाटाघाटीत सहभागी होण्याचे इराणने जाहीर केले आहे. पण अमेरिका व इराणमध्ये अणुकरार होणार नसेल तर इस्रायलने वर्षअखेरीपर्यंत इराणवर हल्ला चढवावा, अशी मागणी इस्रायलच्या लिकूड पक्षाचे नेते ताची हनेबी यांनी केली. तर इराणचा प्रश्न राजनैतिक स्तरावर सोडविण्याला इस्रायल प्राधान्य देत आहे. पण त्याचबरोबर इस्रायल इराणविरोधात इतर पर्यायांचाही विचार करीत असल्याचे इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्याने बजावले आहे.