भारतातील कोरोनाच्या बळींची संख्या १८ हजारांवर

नवी दिल्ली/मुंबई – देशातील कोरोनाच्या बळी गेलेल्यांची संख्या १८ हजारांच्या पुढे पोहोचली आहे. गुरुवारी सकाळपर्यंत चोवीस तासात १९,१४८ नव्या रुग्णांच्या नोंदीसह देशातील एकूण रुग्णांची संख्या ६ लाख ४ हजारांच्या पुढे पोहोचली होती. तर रात्रीपर्यंत देशभरात आणखी तितकेच नवे रुग्ण आढळल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातच एका दिवसात १२५ जणांचा बळी गेला असून ६,३३० नवे रुग्ण आढळले. आठवडाभरापासून राज्यात सुमारे चोवीस तासात पाच हजार नवे रुग्ण आढळत होते. मात्र ही संख्या आता सहा हजारांच्या पुढे गेल्याने चिंता वाढल्या आहेत.

India-Coronaदेशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून दरदिवशी देशभरात ४०० हून अधिक बळी जात आहेत. देशातील या साथीने दगावणाऱ्यांची संख्या १८ हजारांच्याही पुढे गेली आहे. आठवडाभरात देशातील या साथींच्या बळींची संख्या १६ हजारांहून १८ हजारांच्या पुढे गेली आहे. बुधवारी दिवसभरात देशात ४३४ जण दगावले होते, तर मंगळवारी ५०० हुन अधिक जणांचा बळी गेला होता. यामुळे गुरुवार सकाळपर्यंत देशात या साथीने दगावणाऱ्यांची संख्या १७ हजार ८३४ च्या पुढे गेली होती. रात्रीपर्यंत विविध राज्यात आणखी ४०० हुन अधिक बळी गेल्याचे स्पष्ट होते.

महाराष्ट्रात चोवीस तासात १२५ जण दगावले आहेत. मुंबईत ५७ जणांचा बळी गेला आणि १५०० हुन अधिक नवे रुग्ण आढळले. तामिळनाडूत ४३०० नवे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत २३७३ नवे रुग्ण आढळले. उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांमध्येही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली, हरियाणा आणि उत्तरप्रदेशच्या राज्याच्या मुखमंत्र्यांबरोबर बैठक केली.

दरम्यान, जगातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ कोटी ९० हजारांवर पोहोचली आहे. तसेच बळींची संख्या ५ लाख २१ हजार झाली आहे. अमेरिकेतील रुग्णांची संख्या २८ लाखांवर गेली असून या देशातील बळींची संख्या १ लाख ३१ हजारांच्या पुढे गेली आहे.

leave a reply