देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीन लाखांजवळ

- रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत चौथ्या स्थानावर

नवी दिल्ली/ मुंबई – देशात कोरोनाव्हायरसने दगावलेल्यांची संख्या आठ हजारांच्या पुढे पोहोचली असून एकूण रुग्णांची संख्या तीन लाखांजवळ पोहोचली आहे. गुरुवारी महाराष्ट्रात १५२ जणांचा बळी गेला आणि तब्बल ३,६०७ नवे रुग्ण आढळले. दिल्लीतही १८७७ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच तामिळनाडूत १,८७५ नव्या रुग्णांची नोंद झाली. या तीन राज्यातच एका दिवसात सात हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्ण संख्येच्या बाबतीत भारताने आता ब्रिटनलाही मागे टाकले असून भारत कोरोनाच्या जगातिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

CORONAVIRUS-Indiaदेशात गुरुवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासात तब्बल ३५७ जणांचा बळी गेला आणि ९९९६ नवे रुग्ण आढळले. यामुळे देशात या साथीमुळे दगावलेल्यांची संख्या ८,१०२ वर, तर एकूण रुग्णांची संख्या २,८६,५७९ वर पोहोचल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले. एका दिवसात कोरोनाचे मृत्यू आणि रुग्ण संख्येच्या बाबतीत हा नवा उच्चांक ठरला. तर गुरुवारी रात्रीपर्यंत देशातील एकूण रुग्णांची संख्या तीन लाखांजवळ पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. जून महिन्यात पहिल्या १० दिवसातच सुमारे एक लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रातच चोवीस तासात दीडशेहून अधिक जणांचा कोरोनाच्या साथीमुळे बळी गेला आणि ३,६०० हून अधिक रुग्ण आढळले. तब्बल दुसऱ्या दिवशी राज्यात कोरोनाचे साडे तीन हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यामुळे महाराष्ट्रातीलच रुग्ण संख्या ९७,६४८ वर पोहोचली आहे. मुंबईतच चोवीस तासात ९७ जणांचा बळी गेला, तर १५६१ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील या साथीने दगावलेल्यांची संख्या १,९५४ वर पोहोचली आहे, तसेच एकूण रुग्णांची संख्या ५४ हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचे रुग्ण दगावण्याचा आणि नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण जास्त आहे. चोवीस तासात कोरोनाने मीरा-भाईंदरमध्ये नऊ, कल्याण-डोंबिवलीत सात आणि नवी मुंबईत चार जण दगावले.

महाराष्ट्रानंतर दिल्लीत या साथीच्या रुग्ण संख्येत मोठी उसळी दिसून आली आहे. दिल्लीत चोवीस तासात नवे रुग्ण सापडण्याचा नवा उच्चांक नोंदविण्यात आला. दिल्लीतील या साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या हजारांच्या पुढे पोहोचली असून एकूण रुग्णांची संख्या ३४ हजारांवर गेली आहे. तामिळनाडूत कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३८ हजारांच्या पुढे गेली आहे.

भारतात ज्या गतीने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळे चिंतेत अधिकाधिक भर पडत आहे. मात्र भारतात समुदायीक संक्रमण (कम्युनिटी ट्रान्समिशन) झालेले नाही. ८३ जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे, असा खुलासा ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) केला आहे. ‘एम्स’ चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिल्ली, मुंबई सारख्या शहरात समुदायीक संक्रमण सुरु झाल्याची भीती व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर ‘ आयसीएमआर’चा हा खुलासा आला आहे. तसेच प्रति लाख लोकसंख्येच्या तुलनेत देशात कोरोनाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ०.५९ टक्के असून जगात सर्वात कमी आहे, असेही ‘ आयसीएमआर’ने म्हटले आहे.

leave a reply