कोरोनाच्या बळींच्या संख्येत एका आठवड्यात 21 टक्क्यांची वाढ

- जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

21 टक्क्यांची वाढजीनिव्हा/वॉशिंग्टन – कोरोनाच्या साथीची तीव्रता अधिकच वाढत असून एका आठवड्यात कोरोनाच्या बळींची संख्या 21 टक्क्यांनी वाढल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) दिला आहे. अमेरिका व आग्नेय आशियाई देशांमध्ये बळींची संख्या वाढत असल्याकडे ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने लक्ष वेधले आहे. बळींबरोबरच रुग्णांची संख्याही वाढत असून दोन आठवड्यांच्या कालावधीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 20 कोटींवर गेलेली असेल, असा दावा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने केला.

2019 सालच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने जगभरात हाहाकार उडविला असून अजूनही त्याचा फैलाव वेगाने चालू आहे. जगभरात 19.6 कोटी कोरोना रुग्ण आढळले असून बळींची संख्या सुमारे 42 लाखांनजिक पोहोचली आहे. जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये साथीची दुसरी व तिसरी लाट सुरू आहे. कोरोनाव्हायरसचे नवे ‘स्ट्रेन’ विकसित होत असून त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच साथीच्या रोगांच्या विशेषज्ञ असणर्‍या डॉ. मारिआ व्हॅन केर्खोव्ह यांनी, कोरोनाच्या साथीची अखेर होण्याच्या क्षणापासून जग अधिकाधिक दूर होत चालले आहे, असे बजावलेही होते.

21 टक्क्यांची वाढया पार्श्‍वभूमीवर, ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. ‘डब्ल्यूएचओ’ने बुधवारी जाहीर केलेल्या माहितीत, अमेरिका खंडात रुग्ण व बळी दोघांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाल्याचे म्हंटले आहे. अमेरिका खंडात सात दिवसात 12 लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून जवळपास 29 हजार जणांचा बळी गेला आहे. एकट्या अमेरिकेत रुग्णांच्या संख्येत तब्बल 131 टक्क्यांनी वाढ होऊन त्या पाच लाखांवर गेल्या आहेत. त्यापाठोपाठ ब्राझिलमध्ये जवळपास सव्वातीन लाख रुग्ण आढळले आहेत. आग्नेय आशियातील इंडोनेशिया कोरोना साथीचा नवा ‘हॉटस्पॉट’ म्हणून समोर येत आहे. इंडोनेशियात एका आठवड्यात दोन लाख 89 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून 9 हजार 697 जणांचा बळी गेला आहे. लॅटिन अमेरिकेत इक्वेडोर व ब्राझिलमध्ये सर्वाधिक बळींची नोंद झाली आहे. इक्वेडोरमध्ये सात दिवसांमध्ये 8 हजार 864 जणांचा तर ब्राझिलमध्ये 7 हजार 942 जणांचा बळी गेला आहे. रशियातही बळींची संख्या वाढत असून एका आठवड्यात पाच हजारांहून अधिक जण दगावले आहेत.

अमेरिका खंडातील 35 पैकी 20 देशांमध्ये कोरोनाचा ‘डेल्टा व्हेरिअंट’ फैलावला असून इक्वेडोरसह अर्जेंटिना, कोलंबिया, क्युबा व पॅराग्वे या देशांमध्ये बळींची संख्या वाढत असल्याचे ‘पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (पॅहो) बजावले आहे. लॅटिन अमेरिका व कॅरिबियन क्षेत्रातील देशांमध्ये फक्त 16.6 टक्के जनतेचे लसीकरण झाले असल्याकडेही ‘पॅहो’ने लक्ष वेधले.

leave a reply