देशातील इंटरनेट कनेक्शनची संख्या ७५ कोटींवर

नवी दिल्ली – देशातील इंटरनेट कनेक्शनची संख्या ७५ कोटींवर गेली आहे. ‘टेलिकॉम रेग्युलटरी ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ने(ट्राय) ही माहिती जाहीर केली. देशात इंटरनेट सुविधा सुरु होऊन २५ वर्ष उलटल्यानंतर हा टप्पा गाठला गेला आहे. ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेमुळे हा सकारात्मक बदल पहायला मिळाल्याचे सांगितले जाते. गेल्या चार वर्षात देशात इंटरनेट कनेक्शनच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचे ‘ट्राय’ने म्हटले आहे.

इंटरनेट कनेक्शन

१५ ऑगस्ट १९९५ साली देशात इंटरनेट सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. २०१५ साली देशात ‘डिजिटल इंडिया’ मोहीम सुरु झाली. या मोहिमेअंतर्गत देशात इंटरनेटचे जाळे उभारले जात आहे. २०१६ साली देशातील इंटरनेट कनेक्शनची संख्या ३४ कोटी इतकी होती. दोन वर्षांनी २०१८ साली ही संख्या ५० कोटींवर गेली. २०२० सालच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत इंटरनेट कनेक्शनची संख्या ७५ कोटीवर गेली, अशी माहिती ‘ट्राय’ने दिली.

महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरातमध्ये इंटरनेट कनेक्शनचे प्रमाण वाढले आहे. शहरी भागात मोबाईल फोन्स आणि डोंगलसाठी इंटरनेट कनेक्शन्स घेतल्याचे समोर आले आहे. ७५ कोटी इंटरनेटपैकी नॅरोबँडसाठी पाच कोटी आणि ब्रॉडबँडसाठी ६९.२ कोटी इंटरनेट कनेक्शन्स घेतली गेली.

leave a reply