देशातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर

नवी दिल्ली/वॉशिंग्टन – देशात चार महिन्यात प्रथमच चोवीस तासात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण ३० हजारावर आले आहे. तसेच कोरोनाने बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९३.२७ टक्क्यांवर गेला आहे. मात्र ही दिलासादायक बाब समोर येत असताना तज्ज्ञांकडून सावधानतेचा इशारा दिला जात आहे. अमेरिका आणि युरोपीय देशात आलेल्या नव्या लाटेकडे तज्ज्ञ लक्ष वेधत आहेत. अमेरिकेत रविवारच्या एका दिवसात १ लाख ८६ हजार रुग्ण आढळले. तसेच जगभरात एका दिवसात ४ लाख ९० हजार नवे रुग्ण आढळले आणि ६ हजार ६०० जणांचा बळी गेला.

कोरोनाचे रुग्ण

देशात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचा आलेख घसरला आहे. रविवारी चार महिन्यानंतर प्रथमच देशात चोवीस तासात ३० हजार रुग्ण आढळले. देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८८ लाख ६८ हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच बळींची संख्या १ लाख ३० हजारांच्या पुढे गेली आहे. या साथीचे आतापर्यंत ८२ लाख ८२ हजार रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९३.२७ टक्क्यांवर गेला आहे.

सोमवारी दिल्लीत ३ हजार ७९७ नवे रुग्ण आढळले आणि ९९ जणांचा बळी गेला. पश्चिम बंगालमध्ये ३,०१२ नव्या रुग्णांची नोंद झाली आणि ५१ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात २,५३५ नवे रुग्ण आढळले आणि ६० जणांचा बळी गेला. दिल्ली आणि पश्चिम बंगाल वगळता इतर राज्यातील नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण घातले आहे आणि मृत्यूदरही घटाला आहे. देशातील मृत्यूदर १.४७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. १५ राज्यामध्ये हा मृत्यूदर देशातील सरासरीपेक्षा कमी आहे.

मात्र ही दिलासादायक बाब समोर येत असताना दिल्लीत येऊन गेलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेकडे आणि युरोप व अमेरिकेत आलेल्या नव्या लाटेकडे तज्ज्ञ लक्ष वेधत आहेत. उत्सव काळात जास्त जण बाहेर पडल्याने आणि एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे हलगर्जीपणा करू नका अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

leave a reply