‘ओआयसी’च्या बैठकीमुळे पाकिस्तान-सौदीतील तणाव वाढला

इस्लामाबाद – जगभरातील अरब-इस्लामी देशांना एकत्र आणणारी ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन-ओआयसी’ची बैठक यशस्वीरित्या आयोजित केल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान करीत आहेत. या बैठकीची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने अफगाणिस्तानसाठी सहाय्याची घोषणा केल्याचे पाकिस्तानच्या सरकारचे म्हणणे आहे. तर सदर बैठक सपशेल अपयशी ठरल्याची टीका पाकिस्तानातूनच होत आहे. त्यातच या बैठकीमुळे पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील तणाव वाढल्याचा दावा आंतरराष्ट्रीय अभ्यासगटाने केला आहे.

‘ओआयसी’च्या बैठकीमुळे पाकिस्तान-सौदीतील तणाव वाढलागेल्या आठवड्यात पाकिस्तानने राजधानी इस्लामाबाद येथे ‘ओआयसी’च्या बैठकीचे आयोजन केले होते. अफगाणिस्तानला मानवतावादी संकटातून वाचविण्याचे आवाहन या बैठकीतून करण्याचे पाकिस्तानने सौदी अरेबियातील ‘ओआयसी’च्या मुख्यालयाला कळविले होेते. याशिवाय इतर कुठल्याही मुद्याला हात घालणार नसल्याचे पाकिस्तानने मान्य केले होते.

पण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी नियोजित मुद्यापलिकडे ‘ओआयसी’च्या सदस्य देशांना संबोधित केल्यामुळे सौदी अरेबिया संतापल्याचे ‘पॉलिसी रिसर्च ग्रूप स्ट्रॅटेजिक इनसाईट’ या अभ्यासगटाने म्हटले आहे. तालिबानने अफगाणिस्तानात शांती, स्थैर्य प्रस्थापित करण्याची जबाबदारी पार पाडावी, अशी सूचना करून तालिबानवर दबाव टाकावा, अशी सौदी अरेबियाची अपेक्षा होती. यासंबंधीची सूचना पाकिस्तानला ‘ओआयसी’मार्फत पोहोचविण्यात आली होती.

पण पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी या बैठकीत तालिबानला मान्यता देण्याचे आवाहन करून सौदीची नाराजी ओढावून घेतल्याचे अभ्यासगटाचे म्हणणे आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबानला मान्यता नाकारल्यामुळे आणि अमेरिकेने जवळपास १० अब्ज डॉलर्सचा निधी रोखल्यामुळे अफगाणिस्तानवर हे संकट कोसळल्याचा आरोप केला. पाकिस्तानचे हे आरोप सौदी अरेबियाला अजिबात पटलेले नाही, असे या अभ्यासगटाचे म्हणणे आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या शेजारी असलेल्या मध्य आशियाई देशांनी ओआयसीच्या बैठकीला विशेष महत्त्व न देता भारताने आयोजित केलेल्या अफगाणिस्तानविषयक बैठकीसाठी आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना धाडले होते. ओआयसीचे यशस्वी आयोजन करण्याचे मोठमोठे दावे करणार्‍या पंतप्रधान इम्रान खान यांचे हे अपयश असून पाकिस्तानसाठी ही शरमेची बाब ठरते अशी टीका विरोधी पक्षनेते करीत आहेत.

leave a reply