मालीने रशियन कंत्राटी जवान तैनात केल्याचा पाश्‍चिमात्य देशांचा आरोप

- मालीच्या सरकारने आरोप फेटाळले

कंत्राटी जवानपॅरिस/बमाको – दहशतवादविरोधी संघर्षासाठी मालीने मर्सिनरीज अर्थात कंत्राटी जवान पुरविणार्‍या ‘वॅग्नर’ या रशियन कंपनीशी सहकार्य केले आहे. रशियाच्या कंत्राटी जवानांची ही तैनाती, मालीसह पश्‍चिम आफ्रिकेतील स्थैर्य व सुरक्षाव्यवस्था धोक्यात टाकेल, असा आरोप फ्रान्ससह १६ पाश्‍चिमात्य देशांनी केला. पण पाश्‍चिमात्य देशांचे हे आरोप मालीच्या सरकारने फेटाळले. रशियन कंत्राटी जवानांच्या तैनातीबाबतचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे मालीच्या सत्तेवर असलेले बंडखोर लष्करी अधिकारी कर्नल असिमी गोईता याच्या राजवटीने फेटाळले आहे.

आफ्रिकेच्या मालीसह ‘साहेल रिजन’मधील दहशतवादविरोधी कारवाईसाठी फ्रान्सने या भागात आपले पाच हजार जवान तैनात केले होते. फ्रान्सप्रमाणे अमेरिका व काही युरोपिय देशांनी देखील साहेल व इतर आफ्रिकी देशांमध्ये आपली सैन्यतैनाती केली होती. पण गेल्या आठ वर्षांपासून पाश्‍चिमात्य देशांच्या दहशतवादविरोधी मोहिमेला अपेक्षित यश मिळालेले नाही.

ड्रोन हल्ले व मोठ्या लष्करी कारवायांनंतरही आफ्रिकेतील अल कायदा, आयएस संलग्न दहशतवादी तसेच स्थानिक कट्टरपंथी टोळ्यांच्या हल्ल्यांमध्ये फरक पडलेला नाही. याउलट दहशतवादी संघटना अधिक प्रबळ झाल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत, काही महिन्यांपूर्वी फ्रान्स तसेच अमेरिकेने या भागातील आपली लष्करी तैनाती कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

पाश्‍चिमात्य देशांच्या या निर्णयावर मालीसह आफ्रिकी देशांमधील जनतेमध्ये असंतोष असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. गेली काही वर्षे दहशतवादविरोधी कारवाईअंतर्गत पाश्‍चिमात्य देशांनी आपल्या देशाची लूट केल्याचा आरोप केला जातो. दहशतवाद्यांशी लढण्याऐवजी पाश्‍चिमात्य देश माघार घेऊन मालीची सुरक्षा धोक्यात टाकत असल्याची टीका झाली होती. अशा काळात मालीतील कर्नल गोईता यांच्या राजवटीने कंत्राटी जवान पुरविणार्‍या रशियाच्या ‘वॅग्नर’ कंपनीशी संपर्क साधला होता.

दोन महिन्यांपूर्वी कर्नल गोईता यांच्या राजवटीने घेतलेल्या या निर्णयावर फ्रान्स व अमेरिकेने ताशेरे ओढले होते. ‘देशांतर्गत सुरक्षेसाठी बाहेरील शक्तींची मदत घेणे प्रगती व स्थैर्याच्या दृष्टिने योग्य ठरणार नाही’, असे अमेरिकी अधिकार्‍यांनी बजावले होते. वॅग्नर कंपनीबरोबरचे सहकार्य माली व युरोपिय महासंघ तसेच युरोपिय देशांबरोबरील संबंध बिघडवणारे ठरतील, असा इशारा जर्मनी आणि महासंघाने दिला होता. पण यानंतरही मालीने वॅग्नर कंपनीशी सहकार्य सुरू ठेवले होते. वॅग्नर कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी मालीला भेट दिल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

या पार्श्‍वभूमीवर, दोन दिवसांपूर्वी फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, कॅनडा व १२ युरोपिय देशांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून वॅग्नरच्या कंत्राटी जवानांच्या मालीतील तैनातीवर टीका केली. यामुळे मालीतील शांती व सुव्यवस्था धोक्यात येईल, असा इशारा पाश्‍चिमात्य देशांनी दिला. या इशार्‍याच्या काही दिवस आधी युरोपिय महासंघाने वॅग्नर कंपनीवर निर्बंध लादले होते. पण पाश्‍चिमात्य देशांच्या या आरोपांवर मालीच्या सरकारने आक्षेप घेतला आहे.

वॅग्नरचे कंत्राटी जवान मालीमध्ये तैनात असल्याचे पुरावे पाश्‍चिमात्य देशांनी द्यावे, अशी मागणीच मालीच्या सरकारने केली. तर रशियाचे लष्करी प्रशिक्षक आपल्या देशाची सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी सहाय्य करीत असल्याचे मालीच्या सध्याच्या सरकारने जाहीर केले आहे.

leave a reply