इस्रायलचा सहभाग असलेल्या बाहरिन एअर शोमधून ओमान, कुवैतची माघार

एअर शोमधूनमनामा – बुधवारपासून बाहरिनमध्ये सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एअर शोमधून ओमान आणि कुवैत या आखाती देशांनी माघार घेतली आहे. इस्रायलच्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या सहभागाचे कारण देऊन ओमान, कुवैतच्या कंपन्यांनी या एअर शोवर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले. दोन वर्षातून एकदा आयोजित होणाऱ्या या एअर शोमध्ये इस्रायली कंपन्या पहिल्यांदाच सहभागी होत आहेत.

२०२० साली इस्रायल आणि बाहरिनमध्ये अब्राहम करार पार पडला होता. त्यानंतर दोन्ही देशांनी सर्वच क्षेत्रामध्ये परस्पर सहकार्य प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. पण बाहरिन तसेच युएईने इस्रायलबरोबर केलेल्या या कराराचे अरब-आखाती देशांनी समर्थन केलेले नाही. या पार्श्वभूमीवर, बाहरिनने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय एअर शोमधील इस्रायली कंपन्यांचा सहभाग ओमान व कुवैत या देशांना खटकला आहे. म्हणून ओमानच्या सलाम एअर आणि कुवैतच्या कुवैती फायनान्स हाऊसने यातून माघार घेतली आहे. या एअर शोमध्ये सहभागी झालेल्या इस्रायली कंपन्यांची लढाऊ विमाने, ड्रोन्स, क्षेपणास्त्रे गाझातील पॅलेस्टिनींच्या विरोधात वापरली जात असल्याचा आरोप ओमान व कुवैती कंपन्यांनी केला आहे. तर बाहरिनने यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

leave a reply