अमेरिकी बँकांनी रशियातील व्यवहार सुरू ठेवावेत

- बायडेन प्रशासनाने निर्देश दिल्याचा ‘ब्लूमबर्ग’चा दावा

अमेरिकी बँकांनीवॉशिंग्टन/मॉस्को – रशियाच्या मध्यवर्ती बँकेसह परकीय गंगाजळीला लक्ष्य करणाऱ्या अमेरिकेने रशियात सक्रिय असणाऱ्या अमेरिकी बँकांना त्यांचे व्यवहार सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकेच्या कोषागार तसेच परराष्ट्र विभागाकडून यासंदर्भात विनंती करण्यात आल्याचा दावा ‘ब्लूमबर्ग’ या वेबसाईटने केला. जागतिक स्तरावरील मोठे आर्थिक संकट टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे बायडेन प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर मोठे निर्बंध टाकले होते. रशियाच्या मध्यवर्ती बँकेसह परदेशातील रशियाच्या राखीव गंगाजळीला त्यात लक्ष्य करण्यात आले होते. त्याचवेळी रशियन बँका व उद्योगांवर परदेशातील गाशा गुंडाळण्यासाठी दबावही टाकण्यात आला होता. अमेरिका तसेच युरोपातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी रशियातील आपले उपक्रम बंदही केले होते.

अमेरिकी बँकांनीया पार्श्वभूमीवर बायडेन प्रशासनाने आपल्या बड्या बँकांना रशियातील व्यवहार चालू ठेवण्याबाबत विनंती करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. अमेरिकेच्या कोषागार तसेच परराष्ट्र विभागाकडून करण्यात आलेल्या विनंतीमध्ये अमेरिकी डॉलर्समधील व्यवहार, पेमेंट ट्रान्सफर व व्यापारासाठी अर्थसहाय्य यासारख्या सेवा चालू ठेवाव्यात असे सांगण्यात आले आहे. अमेरिकेतील आघाडीच्या बँका असणाऱ्या ‘जेपी मॉर्गन चेस’ तसेच ‘सिटीग्रुप’सारख्या बँकांना असे निर्देश आल्याचा दावा ‘ब्लूमबर्ग’ने केला आहे.

दोन महिन्यांपूर्वी संसदेसमोर झालेल्या सुनावणीत ‘जेपी मॉर्गन चेस’चे प्रमुख जेमी डिमॉन यांनी याबाबत वक्तव्य केले होते. रशियातील व्यवहारांवर विचारलेल्या प्रश्नावर, आम्ही अमेरिकी सरकारच्या सूचनांनुसार काम करीत आहोत, असे प्रत्युत्तर डिमॉन यांनी दिले होते.

leave a reply