‘ओमिक्रॉन’च्या नव्या सबव्हेरियंटचा देशातील पहिला रुग्ण मुंबईत आढळला

पहिला रुग्णमुंबई – देशातून कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्रालयाने मास्क व सोशल डिस्टंन्सिंग सोडून सर्व निर्बंध मागे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनेक राज्यांमधून आता कोरोनाचे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. अशावेळी कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिअंटचा एक्सई या उपप्रकाराची लागण झालेला पहिला रुग्ण देशात आढळला आहे. हा रुग्णांची नोंद मुंबईत झाली असून यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत. ऑमिक्रॉनच्या एक्सई प्रकारामुळेच मार्च महिन्यात युरोप आणि चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले होते.

जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्याच्या विश्‍लेषणात मुंबईतील रुग्णाला ‘एक्सई’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयातील लॅबमध्ये हे नमुने तपासणीसाठी आले होते, अशी माहिती आरोग्य अधिकार्‍याने दिली.

कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरियंटमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट आली होती. याआधीच्या कोरोना व्हेरिअंटपेक्षा अधिक वेगाने पसरणारा हा व्हेरिअंट ठरला होता. तर ओमिक्रॉनच्या सब व्हेरिअंट असलेल्या बीए.१ आणि बीए.२ या उपप्रकारांमुळे युरोपिय देशांना पाचव्या लाटेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ओमिक्रॉनचा एक्सई हा उपप्रकारही आढळला. एक्सई हा सबव्हेरिअंट मुळ ओमिक्रॉन व्हेरिअंटपेक्षा १० पट अधिक वेगाने फैलावणारा असल्याचे लक्षात आले होते.

जानेवारी महिन्यात एक्सई या सबव्हेरिअंटची नोंद झाल्यावर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सावधगिरीचा इशारा दिला होता. याच व्हेरिअंटमुळे मार्च महिन्यात युरोपातील काही देशात अचानक रुग्ण वाढले होते. तसेच चीनमध्ये रुग्णांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे एक्सई व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेला चिंतेत टाकले आहे.

अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार अफ्रिकेतून आलेल्या एका महिलेला या एक्सईची लागण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ही महिला आफ्रिकेतून आली होती. तेव्हापासून ही महिला येथेच राहत असून अफ्रिकेतून परतल्यावर मार्च महिन्यात ही महिला तिच्या कामाच्या ठिकाणी घेण्यात आलेल्या नियमित चाचणीत कोरोनाबाधीत आढळली. तोपर्यंत या महिला रुग्णामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. या महिलेने लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या होत्या. असे अधिकार्‍याने म्हटले आहे. सध्या या महिलेची प्रकृती कशी आहे, याबाबत उलगडा झालेला नाही.

leave a reply