रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिका, नाटोचे सामर्थ्य क्षीण झाले

- इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याचा दावा

सामर्थ्य क्षीण झालेतेहरान – रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिका, नाटो व युरोपचेही सामर्थ्य बर्‍याच प्रमाणात क्षीण झाले आहे, असा दावा इराणी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍याने केला. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील रशियाची प्रतिमा काही अंशी बाधित झालेली आहे. यामुळे सत्तास्पर्धेत चीन अधिक सरस ठरू लागला आहे, असा दावा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे मेजर जनरल याह्या रहिम सफावी यांनी केला आहे.

इराणचे सर्वोच्च धार्मिक नेता आयातुल्ला खामेनी यांचे लष्करी सल्लागार असलेले मेजर जनरल याह्या रहिम सफावी यांनी बुधवारी राजधानी तेहरानमधील लष्करी अधिकार्‍यांची बैठक संबोधित केली. सध्या आंतरराष्ट्रीय निरिक्षकांचे लक्ष लागलेल्या रशिया-युक्रेन युद्धाबाबत मेजर जनरल सफावी यांनी आपली मते मांडली. या युद्धाबाबत अमेरिका, युरोपिय देश व पाश्‍चिमात्य माध्यमे करीत असलेले दावे सफावी यांनी खोडून काढले.

या युद्धामुळे अमेरिका, नाटो आणि युरोपचे सामर्थ्य क्षीण झाल्याचा दावा इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी केला. रशियाने युक्रेनवर हल्ले चढविल्यानंतर अमेरिका व युरोपिय देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले. पण या निर्बंधांची झळ एकट्या रशियाला पोहोचणार नसून अमेरिका व युरोपिय देशांना देखील याचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय किंमत चुकवावी लागेल, याकडे मेजर जनरल सफावी यांनी लक्ष वेधले.

या युद्धामुळे रशियाला नक्कीच हानी सोसावी लागत आहे. रशियाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा काही अंशी बाधित झाल्याचे मेजर जनरल सफावी यांनी मान्य केले. तर चीनला या युद्धाचा सर्वात मोठा फायदा मिळत असल्याचा दावा इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी केला. ‘सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत, जागतिक सत्तेची समीकरणे चीनच्या बाजूने बदलत आहेत. चीन उगवती सत्ता आहे’, असा दावा मेजर जनरल सफावी यांनी केला. या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा इराणने देखील चलाखीने वापर करायला हवा, असे आवाहन खामेनी यांचे लष्करी सल्लागार सफावी यांनी केले.

अमेरिका व नाटोचे लक्ष युक्रेनमधील युद्धाकडे लागलेले आहे. या युद्धामुळे इंधनापासून ते अन्नधान्यापर्यंतच्या टंचाईचा सामना बर्‍याच देशांना करावा लागत आहे. काही देशांमध्ये इंधन तसेच अन्नधान्याच्या टंचाई आणि दरवाढीमुळे निदर्शने सुरू झाली आहेत. याचा फटका या देशांच्या सरकारांना बसू लागला आहे. अशा परिस्थितीत इंधनाची समस्या सोडविण्यासाठी अमेरिकेने आखाती देशांकडे इंधनाचे उत्पादन वाढविण्याची मागणी केली होती. या देशांनी त्याला नकार दिल्यानंतर, अमेरिका इराणबरोबर अणुकरार करून इराणचे इंधन आंतरराष्ट्रीय बाजारात आणण्यासाठी हालचाली करीत आहे. ही परिस्थिती इराणसाठी अनुकूल असल्याचे मेजर जनरल सफावी लक्षात आणून देत आहे.

तसेच युक्रेनच्या युद्धात गुंतलेली अमेरिका आता इराणच्या अणुकार्यक्रमाविरोधात अधिक आक्रमक भूमिका स्वीकारू शकणार नाही, असा तर्क मेजर जनरल सफावी मांडत असल्याचे दिसते. याचा लाभ घेण्याची तयारी इराणने करायला हवी, असे मेजर जनरल सफावी सुचवित आहेत.

leave a reply