राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरोधात अमेरिकी जनतेत तीव्र नाराजी

- अमेरिकी युनिव्हर्सिटीसह इतर सर्वेक्षणांमधील निष्कर्ष

अमेरिकी जनतेतवॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याविरोधात अमेरिकी जनतेत असलेली नाराजीची भावना अधिक तीव्र होत असल्याचे समोर येत आहे. नवीन वर्षात अमेरिकेच्या ‘क्विनिपॅक युनिव्हर्सिटी’ने केलेल्या एका सर्वेक्षणात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची लोकप्रियता तब्बल ३३ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याचे सांगण्यात आले. ‘यु गव्ह’, ‘इप्सॉस’ यासारख्या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातही ५० टक्क्यांहून अधिक अमेरिकी नागरिक बायडेन यांच्या धोरणांबाबत निराश झाल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. बायडेन यांच्याविरोधात जाणार्‍या या सर्वेक्षणांवर व्हाईट हाऊसने नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त देण्यात आले आहे.

अमेरिकेतील ‘क्विनिपॅक युनिव्हर्सिटी’ने गेल्या आठवड्यात केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष नुकताच प्रसिद्ध केला. त्यात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या धोरणांवर ५३ टक्के अमेरिकी नागरिक नाराज असून फक्त ३३ टक्के नागरिकांनी त्यांच्या नेतृत्त्वावर विश्‍वास दाखविला आहे. सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षाच्या समर्थकांपैकी १४ टक्के जणांनी बायडेन यांच्या नेतृत्त्वावर नाराजी दाखविली आहे. बायडेन यांच्याविरोधातील ही वाढती नाराजी कोरोना साथ रोखण्यात आलेले अपयश व अर्थव्यवस्था सावरता न येणे या मुद्यांवरून असल्याचे समोर आले आहे.

अमेरिकी जनतेतराष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरोधातील ही वाढती नाराजी अमेरिकी प्रशासनाला चांगलीच अस्वस्थ करणारी ठरली आहे. व्हाईट हाऊसच्या ‘डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ’ जेनिफर डिलॉन यांनी यासंदर्भात टीका केल्याचे वृत्त ‘ऍक्सिऑस’ या वेबसाईटने दिले आहे. ‘अमेरिकेतील इतर सर्वेक्षणांमध्ये राष्ट्राध्यक्षांची लोकप्रियता सरासरी ४३ टक्के असल्याचे दाखविले आहे. मात्र क्विनिपॅक फक्त ३३ टक्के असल्याचे सांगते आहे. ही बाब खटकणारी आहे’, असे टीकास्त्र डिलॉन यांनी सोडले आहे. मात्र क्विनिपॅक युनिव्हर्सिटीने आपण वापरत असलेली पद्धत योग्य असल्याचे सांगून निष्कर्षाचे समर्थन केले आहे.

क्विनिपॅकबरोबरच ‘यु गव्ह’, ‘इप्सॉस’, ‘रासमुसेन’, ‘मॉर्निंग कन्सल्ट’, ‘डिसिजन डेस्क एचक्यू’ या संस्थांचे निष्कर्षही प्रसिद्ध झाले आहेत. यात बायडेन यांच्यावर नाराज असणार्‍या अमेरिकी नागरिकांची संख्या ५१ टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी आयोवा प्रांतातील एका सर्वेक्षणात हेच प्रमाण ६२ टक्क्यांवर गेल्याचे समोर आले होते.

leave a reply