हवामानात आकस्मिक बदलामुळे जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात

- तपास अहवालाचा निष्कर्ष

हवामानात आकस्मिक बदलनवी दिल्ली – देशाचे पहिले संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूला हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाड किंवा दुर्लक्ष अथवा घातपात जबाबदार नव्हता. तर हवामानात आकस्मिकरित्या झालेल्या बदलामुळे ही दुर्घटना झाली, अशी माहिती वायुसेनने दिली. या दुर्घटनेची तपशीलवार माहिती घेऊन हा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. तसेच या अपघाताच्या चौकशी अहवालात, काही सुधारणांची शिफारस देखील करण्यात आली आहे.

८ डिसेंबर २०२१ रोजी संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांच्यासह हेलिकॉप्टर अपघातात १३ जण मृत्यूमुखी पडले होते. सार्‍या देशाला यामुळे जबर धक्का बसला होता. या अपघातानंतर वायुसेनेच्या ताफ्यातील ‘एमआय-१७ व्ही५’ हेलिकॉप्टरच्या गुणवत्तेवर प्रश्‍न उपस्थित करण्यात येत होते. तसेच वैमानिकाच्या कुशलतेवरही काहीजणांनी शंका घेतली होती. अथवा मानवी चूक किंवा दुर्लक्षाचा भयंकर परिणाम म्हणून ही दुर्घटना झाली असावी, असा संशयही काहीजणांनी व्यक्त केला होता. या पार्श्‍वभूमीवर, वायुसेनेने सदर दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू केली होती.

तिन्ही संरक्षणदलांच्या ‘ट्राय सर्व्हिस कोर्ट ऑफ इन्क्वायरी’मध्ये या दुर्घटनेचा तपास अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये ‘फ्लाईट डेटा रेकॉर्डर’, ‘कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर’ यांची तपासणी करून व घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीकडून माहिती घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. आकस्मिकरित्या हवामानात झालेला बदल हे या अपघाताचे प्रमुख कारण होते. अचानकपणे ढग समोर आल्याने वैमानिकाचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली, असे सदर अहवालात नमूद करण्यात आले आहे.

leave a reply