तालिबानच्या अफगाणिस्तानातील रक्तपातामागे पाकिस्तानचा हात

- सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानच्या राजदूतांचा गंभीर आरोप

संयुक्त राष्ट्रसंघ – तालिबान पाकिस्तानातील ‘सुरक्षित स्वर्गा’चा पुरेपूर लाभ उचलून अफगाणिस्तानात भयंकर रक्तपात घडवित आहे, असा घणाघाती आरोप अफगाणिस्तानचे संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूत गुलाम इसकझई यांनी केला. अफगाणिस्तान व पाकिस्तानची सीमा असलेल्या ड्युरांड लाईनमधून तालिबानचा मुक्त वावर सुरू असल्याचे सांगून यामुळे अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर विश्‍वास राहिलेला नसल्याचा इशारा इसकझई यांनी दिला. सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानवर सुरू असलेल्या चर्चेत राजदूत इसकझई यांनी ही टीका करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर मांडला आहे. त्याचवेळी भारताने सुरक्षा परिषदेत दहशतवाद्यांचे सुरक्षित स्वर्ग व अभयारण्ये तत्काळ नष्ट करण्याची मागणी करून याला कारणीभूत असलेल्या देशांना जबाबदार धरण्याचे आवाहन केले आहे.

तालिबानच्या अफगाणिस्तानातील रक्तपातामागे पाकिस्तानचा हात - सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानच्या राजदूतांचा गंभीर आरोपअफगाणिस्तानने केलेल्या आवाहनानुसार सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपदावर असलेल्या भारताने तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. शुक्रवारी ही बैठक सुरू झाली व या बैठकीत अफगाणिस्तानचे राजदूत इसकझई यांनी तालिबानच्या दहशतीमागे पाकिस्तान असल्याचा गंभीर आरोप केला. तालिबानचे दहशतवादी ड्युरांड लाईनच्या दरम्यान मुक्तपणे वावरत आहेत. तालिबानला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा पुरवठा पाकिस्तानातून केला जातो. तसेच तालिबानी दहशतवाद्यांवर पाकिस्तानच्या हॉस्पिटल्समध्ये उपचार केले जातात, हे जगजाहीर आहे. ही बाब म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९८८मध्ये झालेल्या कराराचे धडधडीत उल्लंघन ठरते. यामुळे अफगाणिस्तान व पाकिस्तानमधल्या विश्‍वासाला हादरे बसत आहेत, असा ठपका राजदूत इसकझई यांनी ठेवला.

गेल्या महिन्यात ताश्कंद येथे पार पडलेल्या अफगाणिस्तानविषयक बैठकीत आपल्या देशाने तालिबानला सहाय्य करू नका, असे आवाहन पाकिस्तानला केले होते, याची आठवण राजदूत इसकझई यांनी करून दिली. अफगाणिस्तानला पाकिस्तानकडून मैत्री व शांतीपूर्ण सहअसित्त्व तसेच एकमेकांच्या सार्वभौमत्त्वाबाबतचा आदर अपेक्षित आहे. पण पाकिस्तान या आवाहनाला प्रतिसाद देत नसल्याचे संकेत देऊन अफगाणिस्तानातील हिंसाचार व अस्थैर्य यामागे पाकिस्तानचे कारस्थान असल्याचे संकेत राजदूत इसकझई यांनी दिले. गेल्या दोन दशकात अफगाणिस्तानात ज्या काही पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या, त्या तालिबान आमच्या डोळ्यादेखत नष्ट करीत आहे. तालिबानच्या हल्ल्यात सर्वसामान्य अफगाणी नागरिकांचा बळी जात असून कित्येकजण जखमी होत आहेत, अशी खंत अफगाणिस्तानच्या राजदूतांनी व्यक्त केली.

या भयंकर अत्याचारांमागे केवळ तालिबान नसून विविध देशांमध्ये सक्रीय असलेले दहशतवाद्यांचे नेटवर्क यामागे आहे, असा आरोप राजदूत इसकझई यांनी केला. अफगाणिस्तानच्या राजदूतांनी केलेल्या या आरोपांना भारताने दुजोरा दिला आहे. भारताचे राजदूत तिरूमुर्ती यांनी भारताचा शेजारी देश असलेल्या अफगाणिस्तानातील परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. अफगाणिस्तानातील दहशतवादामागे सीमेपलिकडे असलेले दहशतवाद्यांचे सुरक्षित स्वर्ग व अभयारण्ये असल्याचे सांगून भारताच्या राजदूतांनी पाकिस्तानला लक्ष्य केले. इतकेच नाही तर दहशतवाद्यांची हे स्वर्ग व अभयारण्ये तत्काळ नष्ट करायला हवी आणि यामागे असलेल्यांना त्यासाठी जबाबदार धरायला हवे, अशी आग्रही मागणी तिरूमुर्ती यांनी केली आहे.

दहशतवाद जराही खपवून न घेण्याचे धोरण स्वीकारणे भाग आहे, असे सांगून याबाबत आक्रमक भूमिका स्वीकारण्याचेे आवाहन तिरूमुर्ती यांनी सुरक्षा परिषदेत केले. भारत सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानचा प्रश्‍न उपस्थित करून पाकिस्तानला धारेवर धरणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते.

leave a reply