पाकिस्तान दिवाळखोर बनला आहे

- संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांची जाहीर कबुली

दिवाळखोर

इस्लामाबाद – पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहरातील पोलीस मुख्यालयावर ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या दहशतवाद्यांनी हल्ला चढवून सात जणांचा बळी घेतला. ही पाकिस्तानी माध्यमांनी दिलेली माहिती असून प्रत्यक्षात तेहरिकच्या दहशतवाद्यांनी याहून कितीतरी अधिक संख्येने पोलिसांचा बळी घेतल्याचा दावा केला जातो. इतकेच नाही तर या दहशतवाद्यांनी बराच काळ कराची पोलीस मुख्यालय वेठीस धरले होते. तरीही या भीषण दहशतवादी हल्ल्यापेक्षा पाकिस्तानच्या जनतेला आर्थिक संकटाची अधिक चिंता वाटत असल्याचे दिसते. या देशाचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी पाकिस्तान दिवाळखोर बनलेला आहे, अशी जाहीर कबुली दिली. त्याचवेळी दहशतवाद हे पाकिस्तानच्या नशिबाचा भाग बनलेला आहे, असेही ख्वाजा असिफ पुढे म्हणाले.

भीषण आर्थिक संकट, अन्नधान्य व इंधन तसेच औषधांची टंचाई आणि कडाडलेली महागाई या साऱ्यांनी पाकिस्तानची जनता हैराण झाली आहे. याबरोबरच दहशतवाद्यांचे भयंकर हल्ल्यांनी पाकिस्तानची दैना उडली आहे. कराचीतील पोलीस मुख्यालयावर तालिबानने चढविलेला दहशतवादी हल्ला पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचे जागतिक पातळीवर धिंडवडे काढीत आहे. पाकिस्तानातील पोलीस दलांना लक्ष्य करणारा हा तिसरा मोठा दहशतवादी हल्ला ठरतो. याआधी पेशावर, क्वेट्टा या शहरांतील पोलिसांना दहशतवाद्यांनी लक्ष केले होते. त्यामुळे दहशतवादी पाकिस्तानच्या मोठ्या शहरांमध्येच रक्तपात घडवून आपल्या ताकदीचे प्रदर्शन करीत असल्याचा दावा केला जातो. कराचीतील पोलीस मुख्यालयावर शुक्रवारी झालेला हल्ला म्हणजे पुढे होणाऱ्या हल्ल्याची रंगीत तालिम होती. पुढच्या काळात कराचीतील पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करतील, असा इशारा भारताच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या जनतेला सुरक्षेपेक्षाही आर्थिक संकटाच्या चिंतेने भेडसावल्याचे दिसते. म्हणूनच कराचीत झालेल्या या दहशतवादी हल्ल्यापेक्षाही पाकिस्तानात इंधनाचे वाढलेले तर, अन्नधान्याची टंचाई व महागाईवर अधिक चर्चा केली जात आहे. पाकिस्तानच्या रुपयाची विक्रमी घसरण झाली असून काळ्याबाजारात पाकिस्तानात तीनशे रुपये मोजून डॉलर खरेदी केले जात आहेत. पाकिस्तानी शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर गाड्यांची रांग लागलेली आहे. 275 रुपये लीटर इतक्या दराने पेट्रोल खरेदी करण्याची तयारी दाखवूनही इथे पेट्रोल मिळत नसल्याचे सांगितले जाते.

या परिस्थितीचा दाखला देऊन पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी आपला देश दिवाळखोर बनलेला आहे, याची जाणीव पाकिस्तानी जनतेला करून दिली. पाकिस्तानसाठी आवश्यक असलेल्या गोष्टीही आयात करणे आता शक्य राहिलेले नाही, याची कबुली ख्वाजा असिफ यांनी दिली. तसेच या स्थितीला आधी सत्तेवर असलेले इम्रान खान यांचे सरकार जबाबदार असल्याचा ठपका ख्वाजा असिफ यांनी ठेवला. इम्रान खान यांच्या सरकारने स्वीकारलेल्या धोरणांमुळेच दहशतवाद हा पाकिस्तानच्या नशिबाचा भाग बनल्याचा ठपका असिफ यांनी ठेवला.

leave a reply