उत्तर कोरियाकडून आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

- नव्या वर्षातील दुसरी चाचणी

आंतरखंडीय बॅलिस्टिक

प्योनग्यँग/टोकिओ/सेऊल – शुक्रवारी अमेरिका व दक्षिण कोरियाला धमकावल्यानंतर अवघ्या 24 तासात उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. शनिवारी दुपारी घेण्यात आलेल्या या चाचणीतील क्षेपणास्त्राने जवळपास सहा हजार किलोमीटर्सची उंची गाठल्याचा दावा जपानी सूत्रांनी केला. उत्तर कोरियाची राजधानी प्योनग्यँगजवळ असलेल्या सुनान या तळावरून चाचणी घेण्यात आल्याचे दक्षिण कोरियाकडून सांगण्यात आले. 2023 सालातील उत्तर कोरियाची ही दुसरी चाचणी ठरली आहे. यापूर्वी 1 जानेवारीला उत्तर कोरियाने छोट्या पल्ल्याच्या तीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती.

गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग-उन याने आपल्या लष्कराला युद्धाची तयारी करण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर किम जाँगने दिलेल्या या इशाऱ्याला महत्त्व प्राप्त झाल्याचे दक्षिण कोरियन माध्यमांनी म्हटले होते. त्यानंतर दोन दिवसांनी उत्तर कोरियन लष्कराचे सर्वात मोठे संचलन पार पडले. या संचलनात 11 आंतरखंडीय बॅलिस्टिक व एक द्रव-इंधनावर आधारीत लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र पहिल्यांदाच प्रदर्शित करण्यात आले होते. उत्तर कोरियाच्या हुकूमशाही राजवटीतील हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे लष्करी सामर्थ्यप्रदर्शन ठरले होते. या प्रदर्शनानंतर दक्षिण कोरिया, जपान तसेच अमेरिकेतील माध्यमांनी उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधले होते.

या पार्श्वभूमीवर, शनिवारी केलेल्या चाचणीने उत्तर कोरियाच्या आक्रमकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाने अमेरिका व दक्षिण कोरियात होणाऱ्या युद्धसरावाविरोधात धमकावण्यास सुरुवात केली होती. शुक्रवारीदेखील उत्तर कोरियाने अमेरिका व दक्षिण कोरिया या दोन्ही देशांना गंभीर परिणामांचा इशारा दिला होता. अमेरिका आणि दक्षिण कोरियातील युद्धसराव म्हणजे आपल्यावरील हल्ल्याची पूर्वतयारी असल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला होता. या सरावाला उत्तर कोरिया प्रत्युत्तर देईल, असेही बजावण्यात आले होते. शनिवारी केलेली चाचणी त्याचाच भाग दिसतो.

शनिवारी दुपारी चाचणी केलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जपानच्या होक्कायडोपासून काही अंतरावरील सागरी क्षेत्रात कोसळले. हा भाग जपानच्या ‘एक्सक्ल्यूझिव्ह इकॉनॉमिक झोन’चा(ईईझेड) हिस्सा आहे. कोरियन क्षेपणास्त्राने जवळपास 900 किलोमीटर्सहून अधिक अंतर कापले असावे, असा दावा जपान तसेच दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी केला. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी या चाचणीवर प्रतिक्रिया दिली असून सदर घटना आंतरराष्ट्रीय समुदायाला चिथावणी देणारी ठरते, असे बजावले आहे. जपान व दक्षिण कोरिया या दोन्ही देशांनी क्षेपणास्त्र चाचणीबद्दल निषेध व्यक्त करून संयुक्त राष्ट्रसंघटनेकडे तक्रार दाखल केली आहे.

गुरुवारी दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाचा शत्रूदेश व सर्वात मोठा धोका असा उल्लेख करणारा ‘डिफेन्स रिपोर्ट’ प्रसिद्ध केला होता. त्यात उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांसह बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या धोक्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. ‘शत्रूदेश असणारा उत्तर कोरिया सातत्याने अण्वस्त्रांसह जैविक व रासायनिक शस्त्रे विकसित करीत आहे. उत्तर कोरियाकडे 154 पौंड प्लुटोनिअम असून या देशाने छोट्या आकाराची अण्वस्त्रे तयार करण्यात प्र्रगती केली आहे. उत्तर कोरियाकडून विकसित करण्यात येणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे’, असे दक्षिण कोरियाच्या रिपोर्टमध्ये अधोरेखित करण्यात आले होते.

उत्तर कोरिया थेट अमेरिकेपर्यंत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन या क्षेत्रातील तणाव वाढवीत आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्या व सज्जता अमेरिकेच्या अलास्का तसेच कॅलिफोर्निया येथे तैनात हवाई सुरक्षा यंत्रणांना आव्हान देऊ शकतात, अशी चिंता अमेरिकन माध्यमे व्यक्त करीत आहेत.

leave a reply