परराष्ट्रमंत्री भुत्तो यांच्या वादग्रस्त विधानांमुळे पाकिस्तानच्या नेत्याची भारतभेट रद्द

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या ‘जमायत उलेमा-ए-इस्लाम’चे प्रमुख मौलाना फझलूर रेहमान एका कार्यक्रमासाठी भारतात येणार होते. मात्र पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी भारताच्या पंतप्रधानांबद्दल काढलेल्या अनुद्गारांमुळे रेहमान यांची ही भेट रद्द करण्यात आली. अर्थव्यवस्था रसातळाला गेलेली असताना, पाकिस्तानला भारताच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे, त्याखेरीज पाकिस्तानची अर्थव्यवस्था उभी राहू शकणार नाही, असे विश्लेषक व पत्रकार सांगत आहेत. अशा परिस्थितीत बिलावल भुत्तो यांनी बालिश विधाने करून भारताबरोबरील सहकार्याची शक्यता निकालात काढली, अशी खंत हे विश्लेषक व पत्रकार व्यक्त करीत आहेत.

उत्तर प्रदेशात होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मौलाना फझलूर रेहमान चार दिवसांच्या भारत भेटीवर येणार होते. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना, भारताबरोबर चर्चा सुरू करून आपला देश स्थैर्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचा संदेश पाकिस्तानातील काही नेते देऊ पाहत आहेत. भारतद्वेष्ट्या धोरणांसाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानच्या लष्कारानेही नाईलाजाने यासाठी हालचाली सुरू केल्याचे संकेत मिळाले होते. पण राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी हे प्रयत्न उधळून लावत असल्याची टीका या देशाचे मुत्सद्दी व विश्लेषक करीत आहेत. बिलावल भुत्तो यांनी भारताच्या पंतप्रधानांवर केलेली टीका अशाच संकुचित धोरणाचा भाग ठरतो, असा ठपका या मुत्सद्दी व विश्लेषकांनी ठेवला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर मोहीम छेडली आहे. त्याला राजनैतिक भाषेत प्रत्युत्तर देण्यात आपले परराष्ट्र मंत्रालय अपयशी ठरले असून जगभरात पाकिस्तानची दहशतवादी देश अशी प्रतिमा उभी करण्यात भारताला यश मिळत आहे, असा दावा पाकिस्तानची माध्यमे करीत आहेत. यासाठी विधायक राजनैतिक प्रयत्न करण्याच्या ऐवजी पाकिस्तानचे नेते भारताच्या नेतृत्त्वावर शेलक्या शब्दात टीका करून पाकिस्तानी जनतेत लोकप्रियता वाढविण्याचे बेताल प्रयत्न करीत आहेत. याने भारताचे काहीही नुकसान होणार नाही, पण पाकिस्तानची हानी जरूर होईल, असा इशारा पाकिस्तानची माध्यमे देऊ लागली आहेत. असे इशारे देणाऱ्यांमध्ये सतत भारताला लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांचाही समावेश आहे, ही लक्षणीय बाब ठरते.

पाकिस्तानच्या परकीय गंगाजळीत सात अब्ज डॉलर्सहून कमी रक्कम शिल्लक आहे व ही रक्कम देखील पाकिस्तानने दुसऱ्या देशांकडून कर्जाच्या स्वरुपात घेतलेली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात पाकिस्तानच्या तिजोरीत काहीही शिल्लक राहिलेले नाही. चीनने देखील पाकिस्तानकडे पाठ फिरविली असून आखाती मित्रदेश देखील पाकिस्तानला यावेळी सहाय्य करण्यासाठी उत्सुक नाहीत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला मोठे कर्जसहाय्य अपेक्षित होते. पण यासाठी नाणेनिधीने पाकिस्तानसमोर कडक शर्ती लादल्या आहेत. अशा संकटातून भारताबरोबरचे सहकार्यच पाकिस्तानचा बचाव करील, यासाठी पाकिस्तानने आधीपासूनच प्रयत्न करायला हवे होते. पण तसे करण्याऐवजी आपल्या देशाचे नेते संकुचित राजकीय स्वार्थासाठी भारतावर टीका करून देशासमोरील अडचणी वाढवित आहेत, असा आरोप या देशातील बुद्धिमंत वर्ग देखील करू लागला आहे.

leave a reply