भारत एलएसीवर क्षेपणास्त्रांच्या तैनातीसाठी टनेल्स बांधणार

टनेल्सनवी दिल्ली – चीनने एलएसीजवळील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाली सुरू केल्याच्या बातम्या येत असताना, भारतानेही त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. एलएसीच्या जवळच नुकतीच चाचणी पार पडलेल्या ‘प्रलय’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची तैनाती करण्यासाठी भारताने बहुउद्देशिय टनेल्स बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सुमारे १५० ते ५०० किलोमीटर इतक्या अंतरापर्यंत मारा करू शकणाऱ्या प्रलय क्षेपणास्त्रांची एलएसीजवळील क्षेत्रात तैनाती करण्याची तयारी म्हणजे भारताकडून चीनला दिला जात असलेला खरमरीत इशारा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

लडाखच्या एलएसीवरील चिथावणीखोर कारवायांद्वारे भारताच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या चीनने अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता. भारतीय सैन्याने खोड मोडल्यानंतर चीनच्या जवानांना इथून माघार घ्यावी लागली खरी. पण चीनच्या घुसखोरीची ही समस्या इतक्यात सुटणारी नाही, उलट पुढच्या काळात चीनचे लष्कर याची तीव्रता अधिकाधिक प्रमाणात वाढवित राहिल, असे विश्लेषक सांगत आहे. कारण एलएसीवर सातत्याने घुसखोरी करून चीन आपल्या या क्षेत्रावरील दावा अधिक भक्कम करण्याच्या डावपेचांवर काम करीत आहे. यामुळे भारतीय सैनिकांनी रोखल्यानंतर चीनच्या लष्कराने माघार घेतली, तरी ती माघार तात्पुरत्या स्वरुपाची असेल. चीन पुन्हा पुन्हा अशी घुसखोरी करीतच राहिल, असे भारताच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांनी बजावले आहे.

आपल्याला घुसखोरीची भयंकर किंमत मोजावी लागेल, हे ध्यानात आल्याखेरीज चीन असे प्रयत्न थांबविणार नाही, असे या माजी लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासाठी भारताने चीनच्या लष्कराची घुसखोरी रोखण्याचे प्रयत्न करून चालणार नाही. तर चिनी लष्कराची घुसखोरी रोखण्यासाठी शस्त्रास्त्रांचा वापर करण्याची तयारी भारताने दाखवावी. चीन एलएसीचा आदर करणार नसेल, तर भारत देखील चीनबरोबर केलेल्या सीमाकरारांचे पालन करण्यासाठी बांधिल नसेल, याची जाणीव आता चीनला करून देण्याची गरज निर्माण झालेली आहे. तसे झाल्याखेरीज चीन घुसखोरी थांबविणार नाही, असे या माजी लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आपल्या घुसखोरीमुळे भारताबरोबर रक्तरंजित संघर्ष पेट घेऊ शकतो, हे कळल्यानंतर चीन नक्कीच घुसखोरी थांबविल. कारण आजच्या घडीला चीनला भारताबरोबर संघर्ष टाळायचा आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर सध्या मोठे संकट खडे ठाकले असून तैवानने अमेरिका तसेच इतर देशांबरोबर सहकार्य वाढविल्याने चीन अस्वस्थ बनला आहे. अशा परिस्थितीत आपण कधीही तैवानवर हल्ला चढवू शकतो, असे संकेत चीनकडून दिले जात आहेत. अमेरिका व युरोपिय देश सध्या तरी चीनला साथ देण्याची जोखीम पत्करणार नाहीत. अशा परिस्थितीत चीन भारताबरोबर संघर्ष छेडण्याची चूक करणार नाही, असे भारताचे माजी लष्करी अधिकारी व विश्लेषक लक्षात आणून देत आहेत.

म्हणूनच भारतान चीनला जबरदस्त उत्तर देण्याची लष्करी तयारी ठेवावी, अशी मागणी केली जात असून भारताने या दिशेने पावले उचलल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. नुकतीच चाचणी पार पडलेल्या प्रलय क्षेपणास्त्राच्या बॅटरीज्‌‍ एलएसीजवळ तैनात करण्याच्या हालचाली भारताने सुरू केल्या असून यासाठी बहुउद्देशीय भुयारांची बांधणी लवकरच सुरू होईल, असे दावे केले जातात. या टनेल्समध्ये प्रलय तसेच इतर क्षेपणास्त्रे सुरक्षित राहू शकतील. याद्वारे तिबेटच्या भारतानजिक असलेल्या भूभागात क्षेपणास्त्रे व लढाऊ विमाने तैनात करणाऱ्या चीनला भारत खणखणीत प्रत्युत्तर देऊ शकतो. याआधी भारतीय वायुसेनेने एलएसीवरील आपली तैनाती वाढविली असून इथल्या क्षेत्रावर आपली नजर रोखलेली असल्याचे जाहीर केले होते. अशा परिस्थितीत अत्याधुनिक क्षेपणास्त्रांच्या तैनातीची तयारी करून भारताने चीनला आवश्यक तो संदेश दिल्याचे दिसत आहे.

leave a reply