शाहबाज शरीफ पंतप्रधान बनल्याने पाकिस्तानची अण्वस्त्रे असुरक्षित

- माजी पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद – आपल्या जागी शाहबाज शरीफ पंतप्रधानपदावर आल्याने पाकिस्तानची अण्वस्त्रे असुरक्षित बनली आहेत, असा खळबळजनक दावा माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला. तसेच आपण पंतप्रधानपदावरून खाली आल्यानंतर भारत व इस्रायलमध्ये जल्लोष झाल्याचेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या पेशावर येथील रोड शोमध्ये बोलताना इम्रान खान यांनी भारत, इस्रायल व अमेरिकेला हवे असलेेले नेते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी आल्याची टीका केली. त्यांची ही बेताल वक्तव्ये आणि बेजबाबदार कारवाया, पाकिस्तानात अराजक माजवतील, असा इशारा पत्रकार व विश्‍लेषक देत आहेत.

पाकिस्तानची अण्वस्त्रेअण्वस्त्रांबाबत माजी पंतप्रधानांनी केलेले दावे पाकिस्तानच्या लष्कराने खोडून काढले आहेत. देशाची अण्वस्त्रे ही कुणा एकाची मालकी नाही, असे सांगून अण्वस्त्रे सुरक्षित असल्याचे पाकिस्तानी लष्कराने स्पष्ट केले. त्याच्या आधी इम्रान खान यांचे सरकार पाडण्यासाठी अमेरिकेने कारस्थान आखले होते, हा आरोप देखील पाकिस्तानी लष्कराने धुडकावून लावला. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील हा आरोप फेटाळला आहे. पण बुधवारी पेशावर येथे आयोजित करण्यात आलेल्या रोड शोमध्ये बोलताना इम्रान खान यांनी भारत, इस्रायल व अमेरिकेवर आरोपांची फैर झाडली. यावेळी त्यांनी केलेली बेजबाबदार विधाने पाकिस्तानला अडचणीत टाकणारी असल्याची जबरदस्त टीका होत आहे.

सरकार कोसळल्यानंतर इम्रान खान यांच्या पक्षाच्या संसद सदस्यांनी राजीनामा दिला होता. यामुळे पाकिस्तानात फार मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्याचवेळी इम्रान खान व त्यांचे सहकारी देशभरात सरकारविरोधी निदर्शने आयोजित करून पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेलाच आव्हान देत आहेत. यातल्या काहीजणांनी तर पाकिस्तानचे राष्ट्रध्वज पेटवून दिले आहेत. इतकेच नाही तर इम्रान खान यांच्या परदेशातील समर्थकांनी आपले पाकिस्तानी पासपोर्ट जाळून टाकल्याचे व्हिडिओज् समोर येत आहेत. आत्ताचे सत्ताधारी व इम्रान खान यांचे समर्थक यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाल्याच्याही बातम्या सातत्याने प्रसिद्ध होत आहेत.

आधीच इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारी आणि दहशतवाद्यांचे हल्ले याने खिळखिळे बनलेल्या पाकिस्तानात पेटलेला हा राजकीय संघर्ष अधिकच अस्थैर्य माजविल, असे इशारे ख्यातनाम पत्रकार आणि विश्‍लेषक देत आहेत.

leave a reply