‘एफएटीएफ’च्या धास्तीने पाकिस्तानने दहशतवादी ‘हक्कानी’ला अफगाणिस्तानात धाडले

काबूल – पुढच्या आठवड्यात होणार्‍या ‘फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स’च्या (एफएटीएफ) बैठकीत पाकिस्तान ब्लॅकलिस्ट होणे जवळपास निश्चित झाल्याचा दावा केला जातो. या काळ्या यादीपासून वाचण्यासाठी पाकिस्तानने मित्रदेशांचे उंबरठे झिजवण्यास सुरू केले आहे. त्याचबरोबर ‘एफएटीएफ’ची कारवाई टळेपर्यंत पाकिस्तानच्या लष्कराने ‘हक्कानी नेटवर्क’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ‘सिराजुद्दीन हक्कानी’ला अफगाणिस्तानात तात्पुरते बस्तान हलविण्याची सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. हक्कानीच नाही तर पाकिस्तानातील इतर दहशतवादी संघटनांचे दहशतवादी देखील अफगाणिस्तानात तळ ठोकून असल्याचे गेल्या काही दिवसांच्या बातम्यांमधून उघड झाले आहे.

FATF-Pakistan

‘एफएटीएफ’च्या ब्लॅकलिस्टच्या भीतीने पाकिस्तान धास्तावलेला आहे. ही ब्लॅकलिस्ट टाळण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेतील कंपनीचा वापर करुन ‘एफएटीएफ’वर प्रभाव टाकण्याची योजना आखली आहे. त्याचबरोबर चीन, तुर्की, मलेशिया या देशांशी चर्चा करुन पाकिस्तानच्या समर्थनार्थ मत देण्यासाठी मनधरणी सुरू केली आहे. राजकीय स्तरावर पाकिस्तानच्या या हालचाली सुरू असताना, पाकिस्तानचे लष्कर आणि कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ने मोस्ट वाँटेड यादीत असलेल्या देशातील दहशतवादी संघटना व त्यांच्या प्रमुखांना अफगाणिस्तानात रवाना केल्याचा दावा केला जातो.

Sirajuddin-Haqqani‘एफएटीएफ’शी संलग्न ‘एशिया पॅसिफिक ग्रुप’च्या (एपीजी) बैठकीची कार्यवाही सुरु झाल्याझाल्याच ‘आयएसआय’ने हक्कानी व इतर दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात धाडले आहे. पाकिस्तानात दहशतवादी नाही, हा देखावा ‘आयएसआय’ला उभा करायचा आहे. म्हणूनच पकिस्तानने बलुचिस्तानच्या क्वेट्टामध्ये तळ असलेल्या सिराजुद्दीन हक्कानी या दहशतवादी नेत्याला अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतात रवाना केले आहे. गेल्या आठवड्यात ११ ऑक्टोबर रोजी हेल्मंड प्रांतात तालिबानी दहशतवाद्यांनी घडविलेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात सुरक्षित घुसखोरी करू देण्याची योजना होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढे हेच दहशतवादी हेल्मंडमधल्या संघर्षात सहभागी झाले होते.

हेल्मंडमधल्या संघर्षात तालिबानसोबत ‘अल-कायदा’, ‘लश्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश- ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी लढत असल्याची माहिती समोर आली आहे. हेल्मंडमधल्या या संघर्षात ‘जैश’चे दहशतवादी मोठ्या प्रमाणावर जखमी झाले असून अफगाणिस्तानातील हॉस्पिटल्स या दहशतवाद्यांनी भरुन गेली आहेत. पाकिस्तानच्या या छुप्या युद्धाचा पर्दाफाश झाला असून ‘एफएटीएफ’च्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची नाचक्की झाल्याचा दावा केला जातो. सध्या हेल्मंडमध्ये असलेला सिराजुद्दीन हक्कानी याने तालिबानच्य कमांडर आणि इतर कमांडर्सची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. याआधीही पाकिस्तानची ‘आयएसआय’ दहशतवाद्यांना सहाय्य करीत असल्याचे समोर आले होते.

leave a reply