इराणने अझरबैजानवर हल्ला चढविल्यास पाकिस्तानी लष्कर इराणमध्ये घुसेल

- अझरबैजानच्या संसद सदस्यांची धमकी

अझरबैजानवर हल्लाबाकू/तेहरान – गेल्या काही आठवड्यांपासून इराण आणि अझरबैजानमध्ये तणाव निर्माण झाला असून दोन्ही देशांचे नेते परस्परांना धमक्या देत आहेत. इराणने अझरबैजानवर हल्ला चढविला तर पाकिस्तानचे लष्कर इराणमध्ये घुसेल आणि इराणचे शेपूट छाटून टाकेल, अशी धमकी अझरबैजानच्या नेत्यांनी दिली. यावर संतापलेल्या इराणने अझरबैजानमधील परदेशी हस्तकांचा वाढता हस्तक्षेप सीमेवरील तणावासाठी कारणीभूत असल्याची टीका केली. इराणने उघड उल्लेख टाळून पाकिस्तान व तुर्कीला लक्ष्य केल्याचा दावा इराण व अझरबैजानची माध्यमे करीत आहेत.

वर्षभरापूर्वी नागोर्नो-कराबाख क्षेत्राच्या ताब्यासाठी अझरबैजान व आर्मेनियामध्ये भडकलेल्या संघर्षापासून इराण व अझरबैजानच्या सीमेवर तणाव वाढला आहे. ४४ दिवसांच्या या संघर्षात विजय झाल्यानंतर अझरबैजानने इराणच्या सीमेवरील गस्त वाढविली. तसेच इराणकडून नागोर्नो-कराबाखसाठी जाणार्‍या वाहनांवर अतिरिक्त कर लादण्यास सुरुवात केली होती. यावर इराणमधील व्यापार्‍यांकडून तीव्र प्रतिक्रिया आली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अझरबैजानने नागोर्नो-कराबाखला जाणारा मार्ग बंद करून इराणी वाहनांची कोंडी केली होती.

यामुळे निर्माण झालेल्या तणावाला काही तास उलटत नाही तोच, काही दिवसांपूर्वी अझरबैजानने पाकिस्तान आणि तुर्कीसह इराणच्या सीमेजवळ कॅस्पियन समुद्रात अघोषित युद्धसराव सुरू केला. अझरबैजानचा हा सराव बेकायदेशीर असल्याचा आरोप करून इराणने यावर संताप व्यक्त केला होता. कॅस्पियन समुद्रासंबंधी झालेल्या ऐतिहासिक करारानुसार, या सागरी क्षेत्राचा भाग नसलेल्या देशांबरोबर सराव करून अझरबैजानने सदर कराराचे उल्लंघन केल्याची आठवण इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने करून दिली होती.

पण इराणच्या नाराजीकडे दुर्लक्ष करणार्‍या अझरबैजानने तुर्कीच्या लष्करासोबत नाखिशेवान प्रांतात सराव केला. इराणच्या सीमेला भिडलेल्या नाखिशेवानमधील या सरावाच्या दरम्यान अझरबैजानच्या संसद सदस्यांनी इराणला धमक्या दिल्या. इराणच्या लष्कराने अझरबैजानवर हल्ला चढविला तर पाकिस्तानचे लष्कर इराणमध्ये घुसेल, अशी धमकी एका संसद सदस्याने दिली. तर दुसर्‍या संसद सदस्याने पाकिस्तान इराणचे शेपूट छाटेल, असे सांगून सिस्तान-बलोचिस्तान इराणपासून तोडण्याचा इशारा दिला. तर आणखी एका संसद सदस्याची मजल इराणला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकण्याची धमकी देण्यापर्यंत पोहोचली आहे.

यावर इराणमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अझरबैजानने इराणविरोधात कुठलेही पाऊल उचलण्याच्या आधी नीट विचार करावा, असे इराणचे नेते संसद सदस्य मोहम्मद रेझा अहमदी संगारी आणि अहमद नादेरी यांनी बजावले आहे. तर इराणची क्षेपणास्त्रे सहन करण्याची क्षमता अझरबैजानकडेे नाही, असा इशारा सोशल मीडियावरून इराणचे नागरिक देत आहेत.

leave a reply