पाकिस्तानचे सरकार दहशतवाद्यांना आश्रय देत आहे

- युरोपियन अभ्यासगटाकडून पर्दाफाश

जीनिव्हा – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि परराष्ट्रमंत्री शहा मेहमूद कुरेशी यांनी वारंवार वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर, माध्यमांमध्ये आपला देश दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचे कबूल केले आहे. तेव्हा जगातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान अजूनही संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेचा सदस्य कसा काय असू शकतो? असा खणखणीत सवाल युरोपियन अभ्यासगटाच्या संशोधन विश्लेषिका वेरोनिका यांनी केला. यासाठी वेरोनिका यांनी पाकिस्तानी नेत्यांनीच दिलेल्या कबुलीचा पाढा वाचून दाखविला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या संयुक्त राष्ट्रसंघातील सर्वसाधारण सभेतील भाषणाला काही तास शिल्लक असताना युरोपियन अभ्यासगटाने पाकिस्तानला जबर हादरा दिला आहे.

पाकिस्तानचे सरकार दहशतवाद्यांना आश्रय देत आहे - युरोपियन अभ्यासगटाकडून पर्दाफाश‘युरोपियन फाऊंडेशन फॉर साऊथ एशियन स्टडीज’ या ॲम्स्टरडॅम स्थित अभ्यासगटाने जीनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेच्या बैठकीत पाकिस्तानचे वाभाडे काढले. इम्रान खान यांचा ‘नया पाकिस्तान’ दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याची घणाघाती टीका युरोपियन अभ्यासगटाच्या संशोधन विश्लेषिका वेरोनिका एकेलूंड यांनी केली. हा पाकिस्तानवरील नवीन आरोप नसून या देशाच्या नेत्यांनीच जाहीररित्या दिलेली कबुली असल्याची आठवण वेरोनिका यांनी करुन दिली. यासाठी वेरोनिका यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि परराष्ट्रमंत्री शहा मेहमूद कुरेशी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ, माध्यमे आणि पाकिस्तानच्या पार्लामेंटमध्ये केलेल्या वक्तव्यांचा दाखला दिला.

‘मानवाधिकारांचा आदर सार्वत्रिक आणि सर्वोपरी असून पाकिस्तानसह जगातील सर्व देशांना हा नियम लागू होतो. परंतु दहशतवाद सर्व प्रकारच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करतो’ असे वेरोनिका म्हणाल्या. ‘‘संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी म्हणून जाहीर केलेला आणि ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख मसूद अझहर हा पाकिस्तानातच आश्रयास असल्याचे, परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये ‘सीएनएन’शी बोलताना मान्य केले होते. त्यानंतर पुढच्याच महिन्यात, मार्च २०१९ मध्ये ‘बीबीसी’शी बोलताना कुरेशी यांनी पाकिस्तानचे सरकार आणि ‘जैश’मध्ये अधिकृत स्तरावर संपर्क असल्याचे म्हटले होते’, याची माहिती वेरोनिका यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला दिली.

पाकिस्तानचे सरकार दहशतवाद्यांना आश्रय देत आहे - युरोपियन अभ्यासगटाकडून पर्दाफाश‘‘पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जुलै २०१९ साली अमेरिकेतील ‘युएस इन्स्टिट्युट ऑफ पीस’मध्ये बोलताना पाकिस्तानात ४०,००० दहशतवादी असल्याचे कबुल केले होते. तर जून २०२० मध्ये पाकिस्तानच्या पार्लामेंटमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘अल कायदा’चा प्रमुख ओसामा बिन लादेन याला शहीद घोषित केले होते. गेल्याच महिन्यात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने, संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवाद्यांच्या यादीतील दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असल्याचे जाहीर केले होते’’, याची आठवण वेरोनिका यांनी करुन दिली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या यादीतील दहशतवादी व त्यांच्या संघटनांपैकी १४६ दहशतवादी एकट्या पाकिस्तानातच आहेत. असे असताना, पाकिस्तान अजूनही संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेचा सदस्य कसा काय असू शकतो, असा सवाल करुन वेरोनिका यांनी पाकिस्तानच्या हकालपट्टीची तसेच या देशावर कारवाईची मागणी केली आहे.

leave a reply