पंतप्रधान इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांकडून भारताला चर्चेचा प्रस्ताव

इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान?खान यांनी भारताकडे चर्चेची मागणी करीत असताना, मध्य आशियाई देशांबरोबरील भारताच्या व्यापारासाठी मार्ग खुला करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी देखील जवळपास त्याच शब्दात भारताला हा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही देशांनी आपले मतभेद गाडून सहकार्य प्रस्थापित करायला हवे, असे जनरल बाजवा यांनी सुचविले आहे. भारताच्या विरोधातील विद्वेषासाठी कुख्यात असलेल्या पाकिस्तानच्या लष्कराला झालेली ही उपरती निराळेच संकेत देत आहे.

पाकिस्तानात आयोजित करण्यात आलेल्या सुरक्षाविषयक परिषदेत बोलताना पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताकडे चर्चेची मागणी केली होती. भारत व पाकिस्तानमध्ये केवळ काश्मीर हीच एकमेव समस्या आहे. ती सोडविण्यासाठी चर्चा झाली तर त्याचे फार मोठे लाभ भारताला मिळतील. पाकिस्तान भारताच्या मध्य आशियाई देशांबरोबरील व्यापारासाठी मार्ग खुला करू शकतो, असा प्रस्ताव यावेळी पाकिस्तानी पंतप्रधानांनी दिला. त्याच्या पाठोपाठ लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी देखील भारताला हा प्रस्ताव देऊन पंतप्रधानांच्या प्रस्तावाला लष्कराचे समर्थन असल्याचा संदेश दिला. भारत व पाकिस्तानने भूतकाळातील मतभेद गाडून टाकावे आणि प्रगतीच्या मार्गाने पुढे जावे, असे आपल्याला वाटत असल्याचे जनरल बाजवा म्हणाले.

भारत व पाकिस्तान गरीब देश असूनही विकासावर खर्च करण्याच्या ऐवजी संरक्षणावर सर्वाधिक खर्च करीत आहेत, अशी खंत जनरल बाजवा यांनी व्यक्त केली. म्हणूनच भारत व पाकिस्तानने मतभेद बाजूला सारून वाटाघाटी कराव्या, अशी?आपली अपेक्षा असल्याचे बाजवा म्हणाले. असे आदर्शवादी विचार मांडत असताना देखील, पाकिस्तान काश्मीरचा हेका सोडायला तयार नसल्याचे दिसते. भारताने पाकिस्तानबरोबरील चर्चेसाठी अनुकूल वातावरण तयार करावे व काश्मीरचा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी, काश्मीच्या नियंत्रण रेषेवर संघर्षबंदी लागू करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानी लष्कराने दिला होता. भारताने तो मान्य केला असून यामुळे सध्या तरी नियंत्रण रेषेवर शांतता आहे. त्यानंतरच्या काळात पाकिस्तानकडून भारताला चर्चेचे प्रस्ताव मिळू लागले आहेत. मात्र काश्मीरचा प्रश्‍न या चर्चेत अग्रस्थानी असेल, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. त्याखेरीज चर्चा शक्य नसल्याचे पाकिस्तान वारंवार बजावत आहे. मात्र भारताने या चर्चेसाठी वातावरणाची निर्मिती करण्याची जबाबदारी पाकिस्तानचीच असल्याचे सांगून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भारताबरोबर सहकार्य केले नाही, तर पाकिस्तान वाचू शकणार नाही, असे इशारे या देशातील काही बुद्धिमंत, मुत्सद्दी व पत्रकार आणि व्यापारी वर्ग उघडपणे देत आहे. फार उशीराने ही बाब पाकिस्तानच्या सत्ताधार्‍यांच्या लक्षात आल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

leave a reply