अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या वक्तव्यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची जहाल प्रतिक्रिया

मॉस्को/वॉशिंग्टन – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे मारेकरी असल्याचे सांगून त्यांना लवकरच याची किंमत मोजणे भाग पडेल, असे खळबळजनक वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केले आहे. बायडेन यांच्या या वक्तव्यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. ‘एखादी व्यक्ती स्वतः जशी असते तसेच त्याला इतरांबद्दलही वाटत असते’, असा खरमरीत टोला राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी लगावला आहे. बायडेन यांच्या वक्तव्यानंतर रशियाने माफीची मागणी केली असून रशियाच्या अमेरिकेतील राजदूतांना माघारी बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मंगळवारी ‘एबीसी न्यूज’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांना रशियाने अमेरिकी निवडणुकांमध्ये केलेल्या हस्तक्षेपाच्या अहवालाबाबत प्रश्‍न विचारण्यात आले होते. त्यावेळी मुलाखत घेणार्‍या सूत्रधाराने पुतिन हे मारेकरी आहेत, असे तुम्हाला वाटते का असा सवाल केला. त्यावर उत्तर देताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी, हो मला तसे वाटते, असे खळबळजनक उत्तर दिले. त्याचवेळी पुढे पुतिन यांना याची किंमत मोजणे भाग पडेल व ती काय आहे हे लवकरच दिसून येईल, असेही बजावले.

बायडेन यांच्या या वक्तव्याने रशियात खळबळ उडवली असून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बायडेन यांना थेट शब्दात प्रत्युत्तर दिले. ‘लहानपणी मैदानात खेळताना आम्ही मुले एकमेकांशी भांडताना सतत जो बोलतो तोच असतो, असे चिडवायचो. हा केवळ योगायोग नाही, फक्त लहान मुलांचे बोलणे किंवा विनोदही नाही. त्याला मानसशास्त्रीय दृष्ट्या खूप मोठा अर्थ आहे. आपण नेहमीच आपल्यामध्ये असणार्‍या गोष्टी दुसर्‍यांमध्ये बघतो आणि आपण जसे आहोत तसेच ते असतील, असा विचार करतो. त्याच आधारावर इतर व्यक्तींच्या गोष्टींचा विचार करून त्याच्याविषयीचे मत व्यक्त करतो’, अशा शब्दात पुतिन यांनी बायडेन यांना टोला लगावला आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडूनही यावर प्रतिक्रिया उमटली असून प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी निवेदन प्रसिद्ध केले. त्यात रशिया व अमेरिकेमधील संबंधांवर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आल्याचे सांगून त्यासाठी रशियाचे अमेरिकेतील राजदूत अ‍ॅनातोली अँटोनोव्ह यांना माघारी बोलाविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. रशियाच्या संसद सदस्यांनी अमेरिकेकडून माफीची मागणी केली असून राजदूतांच्या माघारीचे समर्थन केले आहे.

अमेरिकेच्या ‘ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’ने मंगळवारी १५ पानाचा अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये २०२० साली पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीला परदेशी हस्तकांकडून धोका होता, असे सांगून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना दोषी धरले होते.

leave a reply