फिलिपाईन्सने चीनबरोबरील पाच अब्ज डॉलर्सचा करार रद्द केला

-चीन गुंतवणूकच करीत नसल्याचा आरोप

deal-Chinaमनिला/बीजिंग – चीन पैसे देत नसल्याचा आरोप करून फिलिपाईन्सच्या नव्या सरकारने पाच अब्ज डॉलर्सचा रेल्वे करार रद्द केला आहे. फिलिपाईन्सचे नवे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्यु. यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर आले. फिलिपाईन्सचा हा नवा निर्णय चीनच्या ‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह’ला बसलेला मोठा धक्का मानला जातो.

Philippines-deal-Chinaचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह’ अंतर्गत चीनने जगातील विविध देशांमध्ये ट्रिलियन डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केल्याचे सांगण्यात येते. मात्र गेल्या काही वर्षात ही गुंतवणूक धोक्यात आली असून युरोप, आफ्रिका तसेच आशियातील अनेक देशांनी चीनबरोबर झालेले करार रद्द करण्यास सुरुवात केली आहे.

चीनने केलेली गुंतवणूक म्हणजे कर्जाचा विळखा असल्याचे विविध अहवालांमधून समोर आले आहे. चीनच्या कर्जामुळे युरोप, आफ्रिका तसेच आशियातील काही देशांच्या अर्थव्यवस्था अडचणीत आल्या असून श्रीलंका त्याचे ताजे उदाहरण ठरते. श्रीलंकेतील घडामोडींनंतर अनेक देशांनी चीनबाबत सावधगिरीची भूमिका घेतली असून फिलिपाईन्सने रद्द केलेला करार त्याचाच भाग दिसतो. या करारानुसार, चिनी कंपन्या फिलिपाईन्समध्ये तीन रेल्वे प्रकल्पांची उभारणी करणार होत्या.

मात्र चीनकडून वेळेत निधी येत नसल्याचे कारण पुढे करून राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्यु. यांनी करार रद्द केले आहेत. या प्रकल्पांसाठी खाजगी गुंतवणूकदार किंवा इतर देशांकडून निधी उभारण्यात येईल, असे संकेत सरकारने दिले.

leave a reply