चिनी हवाई दलाच्या हालचालींवर वायुसेनेची करडी नजर

-एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनच्या लष्करामध्ये चर्चेची 16वी फेरी रविवारी सुरू झाली. त्याच्या आधी एलएसीजवळून चीनच्या विमानांनी उड्डाण केल्याचे समोर आले आहे. मात्र चीनची विमाने एलएसीच्या हवाई क्षेत्राजवळ आल्यानंतर, वायुसेनेने त्वरित प्रत्युत्तरादाखल आवश्यक ती कारवाई केल्याची माहिती वायुसेनाप्रमुख एअरचीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी दिली. चिनी हवाई दलाच्या कारवाईवर वायुसेनेची नजर रोखलेली आहे, असे वायुसेनाप्रमुख पुढे म्हणाले.

chinese-air-forceरविवारी सकाळी 9.30 वाजता भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा सुरू झाली. या चर्चेचे तपशील अद्याप उघड झालेले नसले तरी चीनने लडाखच्या एलएसीजवळील क्षेत्रातून माघार घ्यावी, या मागणीवर भारत ठाम राहणार असल्याचे दिसत आहे. तर चीन यावेळीही भारताच्या या मागणीला बगल देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी भारताचे तत्कालिन लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी चीन सीमावाद सोडविण्यासाठी गंभीर नसल्याचे सांगून चीनवर अप्रमाणिकपणाचा ठपका ठेवला होता. त्याचा प्रत्यय भारताला सातत्याने येत आहे.

एलएसीवरील चर्चा सुरू होण्याच्या आधी चीनच्या हवाई दलातील विमानाने लडाखच्या एलएसीजवळील क्षेत्राजवळून उड्डाण केल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र वायुसेनेने त्वरित कारवाई करून चीनच्या विमानाला त्वरित माघार घेण्यास भाग पाडले होते. आता वायुसेनाप्रमुखांनी एका मुलाखतीत याबाबत विधान करून चीनने या चिथावणीखोर कारवाया केल्या होत्या, या बातमीवर शिक्कामोर्तब केले. चीनच्या हवाई दलाच्या हालचालीवर वायुसेनेची करडी नजर आहे. एलएसीजवळील क्षेत्रातून चीनची विमाने किंवा मानवरिहत विमानांनी उड्डाण केले की वायुसेना त्याविरोधात त्वरित आवश्यक ती कारवाई करते, असे एअरचीफ मार्शल चौधरी यांनी म्हटले आहे.

2020 साली झालेल्या गलवानमधील संघर्षानंतर वायुसेनेने लडाखच्या क्षेत्रात रडार यंत्रणा तैनात केलेली असून वायुसेनेने या क्षेत्रातील आपली क्षमता प्रचंड प्रमाणात वाढविली आहे. वायुसेनेच्या तैनातीमध्ये जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या यंत्रणेचाही समावेश आहे. तसेच या क्षेत्रात निरिक्षणासाठी नव्या पोस्ट वायुसेनेने उभारल्याआहेत. तसेच देशाचे लष्कर व इतर यंत्रणांकडून वायुसेनेला आवश्यक ती माहिती वेळोवेळी पुरविली जाते, असे वायुसेनाप्रमुखांनी स्पष्ट केले.

तैवानच्या विरोधात चीनच्या हवाई दलाने ग्रे झोन वॉरफेअरचा वापर सुरू केला आहे. यानुसार चीनचे हवाई दल तैवानच्या क्षेत्रात वारंवार घुसखोरी करून तैवानच्या हवाई सुरक्षेची चाचपणी करते. वारंवार घुसखोरी करून तैवानला जेरीस आणणे व एक दिवस निर्णायक हल्ला चढविण्याची योजना चीनने या ग्रे झोन वॉरफेअरद्वारे आखल्याचे सांगितले जाते. भारताच्या विरोधातही चीन असे डावपेच वापरण्याचा प्रयत्न करीत आहे खरा. पण लडाखच्या क्षेत्रात भारतीय वायुसेना चीनच्या हवाई दलाच्या तुलनेत खूपच मजबूत स्थितीत आहे. गलवानच्या संघर्षानंतर पाश्चिमात्य देशांमधील तटस्थ विश्लेषकांनीच हा निष्कर्ष नोंदविला होता. त्यानंतर चीनने लडाखजवळील तिबेटच्या क्षेत्रातील आपल्या हवाई दलाची क्षमता वाढविण्यासाठी पावले उचलली होती. याद्वारे भारतावर दडपण टाकण्याचा आणखी एक प्रयत्न चीन करीत आहे. पण वायुसेनाप्रमुखांनी केलेली विधाने भारत चीनच्या या दबावतंत्राला बळी पडणार नसल्याचा संदेश देत आहेत.

leave a reply