भारताचे पंतप्रधान व अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची फोनवर चर्चा

वॉशिंग्टन – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी फोनवरून चर्चा केली. कोरोनाच्या साथीचा मुकाबला करून जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्धार उभय नेत्यांनी या चर्चेत व्यक्त केला. त्याचवेळी खुल्या व स्वतंत्र इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या पुरस्काराबरोबर दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका स्वीकारण्यावरही दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती दिली जात आहे.

कॅनडा, मेक्सिको, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, रशिया, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी भारताच्या पंतप्रधानांशी फोनवरून चर्चा केली. भारताच्या पंतप्रधानांशी चर्चा करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी लावलेला विलंब अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात झालेल्या बदलांचे संकेत देत आहे, असा सूर माध्यमांनी लावला होता. राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केेलेल्या भाषणातही भारताचा उल्लेख नव्हता. इतकेच नाही तर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्राचा उल्लेख करण्याचेही टाळले होते.

यामुळे बायडेन प्रशासन इंडो-पॅसिफिक क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चीनला या क्षेत्रात वर्चस्व गाजविण्याची मोकळीक देईल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्याचवेळी भारताबरोबरच्या सहकार्याला बायडेन विशेष महत्त्व देणार नाहीत, असे काही विश्‍लेषक सांगू लागले होते. तर चीनच्या विरोधात बायडेन यांचे प्रशासन भारताचा वापर जरूर करील, त्याचवेळी भारताच्या विरोधात पाकिस्तानचा वापर करताना बायडेन यांचे प्रशासन मागेपुढे पाहणार नाही, असे काही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

या पार्श्‍वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर फोनवर चर्चा पार पडल्याची माहिती ‘व्हाईट हाऊस’ने दिली. लोकशाहीच्या मुल्यांवर आधारलेले भारत व अमेरिकेचे संबंध अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. त्याचवेळी म्यानमारमध्ये पुन्हा लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही दोन्ही नेत्यांनी मान्य केले. तसेच इतर जागतिक समस्या व आव्हानांसंदर्भात चर्चा करीत राहण्याचा निर्णयही दोन्ही नेत्यांनी फोनवरील या चर्चेत घेतल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले.

अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजित सिंग संधू यांनीही पुढच्या काळात दोन्ही देशांच्या सहकार्यात वाढ होईल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या धोरणांकडे भारतातील मुत्सद्दी अत्यंत सावधपणे पाहत आहेत. विशेषतः बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर चीनच्या आक्रमकतेत झालेली वाढ निराळेच संकेत देत आहे, याकडे लक्ष वेधले जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरील चर्चेत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ‘क्वाड’ संघटन भक्कम करण्यावरही चर्चा केल्याचे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात बायडेन प्रशासन त्याकडे विशेष लक्ष देणार नाही, असा संशय सामरिक विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

leave a reply