‘जी२०’ च्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी इटलीमध्ये दाखल

रोम – जी२०च्या बैठकीसाठी इटलीमध्ये दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीची राजधानी रोममध्ये दाखल झाले. इथे भारताच्या पंतप्रधानांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ऊर्जा संकट, कोरोनाच्या साथीनंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न आणि कोरोनाचा नवा धोका व जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांवर जी२०च्या या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पंतप्रधानांचा या बैठकीतील सहभाग महत्त्वाचा ठरतो.

‘जी२०’ च्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी इटलीमध्ये दाखलपंतप्रधान मोदी यांची युरोपियन महासंघाच्या प्रमुख ‘उर्सुला वॉन देर लेयन’ व युरोपिय काऊन्सिलचे प्रमुख चार्ल्स मिशेल यांच्याशी चर्चा पार पडली. ‘भारत आणि युरोपिय महासंघाचे धोरणात्मक सहकार्य योग्य दिशेने पुढे चालले आहे. व्यापारी करारांवर भारताची युरोपिय महासंघाबरोबरील वाटाघाटी लवकरच सुरू होत आहेत. तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारताबरोबर सहकार्य वाढविण्यासाठ युरोपिय महासंघ उत्सुक आहे’, असे युरोपियन महासंघाच्या प्रमुख ‘उर्सुला वॉन देर लेयन’ म्हणाल्या. याबरोबरच भारताने कोरोनाच्या लसीकरणाबाबत मिळविलेल्या यशाची लेयन यांनी प्रशंसा केली. सार्‍या जगाचे लसीकरण करून कोरोनाच्या साथीविरोधात लढा देण्यासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे लेयन यांनी म्हटले आहे.

‘पर्यावरणपूरक बदलांमध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. जागतिक आरोग्य, महामारीशी लढा, अफगाणिस्तान व इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील परिस्थिती, यासंदर्भात भारताच्या पंतप्रधानांशी चर्चा पार पडली’, अशी माहिती युरोपियन काऊन्सिलचे प्रमुख चार्ल्स मिशेल यांनी दिली. ‘पंतप्रधान मोदी व युरोपिय महासंघाच्या प्रतिनिधींशी झालेली चर्चा व्यापक होती. यामध्ये व्यापारी संबंधांपासून ते आंतरराष्ट्रीय तसेच क्षेत्रिय घडामोडींचा समावेश होता’, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली.

दरम्यान, रोम येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून पंतप्रधान मोदी यांनी गांधीजींचे विचार आजही लाखोजणांना प्रेरणा देत असल्याचे म्हटले आहे. आपल्या या दौर्‍यात पंतप्रधान मोदी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान मोदी ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच धर्मगुरू आदरणीय पोप फ्रान्सिस यांची भेट घेणार आहेत. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांनी याची माहिती दिली.

leave a reply