अमेरिकेने इराणवर नवे निर्बंध लादले

- अमेरिकेची भूमिका विरोधाभासी असल्याची इराणची टीका

इराणवर नवे निर्बंधवॉशिंग्टन/तेहरान – इराणचे ड्रोन्स क्षेत्रीय तसेच आंतरराष्ट्रीय शांती व स्थैर्यासाठी धोकादायक ठरत असल्याचा आरोप करून अमेरिकेने इराणवर नवे निर्बंध लादले. इराणच्या ड्रोन कमांडचे प्रमुख व संबंधित कंपन्यांवर अमेरिकेच्या कोषागार विभागाने ही कारवाई केली. यामुळे इराण खवळला असून अमेरिकेवर ताशेरे ओढले. इराणबरोबर अणुकरारावर वाटाघाटी करीत असताना, दुसर्‍या बाजूला हे निर्बंध लादून अमेरिका याच्या विरोधी वर्तन करीत आहे, अशी टीका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली.

अमेरिकेच्या कोषागार विभागाने शुक्रवारी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे वरिष्ठ अधिकारी व दोन कंपन्यांना काळ्या यादीत टाकलेे. यामध्ये रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या ड्रोन कमांडचे प्रमुख ब्रिगेडिअर जनरल सईद अघाजानी यांचा समावेश असल्याचे अमेरिकेने जाहीर केले. यावर्षी ब्रिगेडिअर जनरल अघाजानी यांच्या नेतृत्वाखाली पर्शियन आखातातून प्रवास करणार्‍या इंधन तसेच मालवाहू जहाजांवर ड्रोन हल्ले झाले होते. यामुळे आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीला धोका निर्माण झाल्याचा आरोप करून अमेरिकेच्या कोषागार विभागाने ही कारवाई केली.

इराणवर नवे निर्बंधया वर्षातील दोन प्रमुख घटना इराणवरील निर्बंधांसाठी कारणीभूत असल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला. जुलै महिन्यात ओमानच्या आखाताजवळ इस्रायलच्या ‘मर्सर स्ट्रिट’ या मालवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याची आठवण कोषागार विभागाने करुन दिली. या हल्ल्यात दोन कर्मचार्‍यांचा बळी गेला होता. यामध्ये ब्रिटिश नागरिकाचा समावेश असल्याचे उघड झाल्यानंतर इस्रायल व ब्रिटनने इराणवर आगपाखड केली होती.

तर दुसर्‍या ड्रोन हल्ल्याची माहिती देण्याचे अमेरिकेच्या कोषागार विभागाने टाळले. पण गेल्या आठवड्यात सिरियाच्या अल-तन्फ येथील अमेरिकेच्या लष्करी तळावर झालेला ड्रोन हल्ला यासाठी कारणीभूत असल्याची शक्यता वर्तविण्यात येते. कारण अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने सदर हल्ल्यामागे इराक-सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटना असल्याचा उल्लेख काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यामुळे ब्रिगेडिअर जनरल अघाजानी यांच्यावरील कारवाईमागे अल-तन्फ येथील अमेरिकेच्या लष्करी तळावर झालेला हल्ला असू शकतो, असे बोलले जाते.

२०१९ साली सौदी अरेबियाच्या इंधन प्रकल्पावर झालेल्या सर्वात मोठ्या ड्रोन हल्ल्यामागे देखील अघाजानी असल्याचा आरोप अमेरिका करीत आहे. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी देखील आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात जलवाहतूक करणार्‍या जहाजांवर होणार्‍या ड्रोन हल्ल्यांमागे अघाजानी असल्याचा उल्लेख केला इराणवर नवे निर्बंधहोता. तर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सला हल्लेखोर ड्रोन्सच्या निर्मितीसाठी सहाय्य करणार्‍या किमिया पार्ट सिवान आणि ओजे परवाझ मादो नफर या दोन कंपन्यांवरही अमेरिकेने निर्बंध लादले.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या नव्या निर्बंधांवर सडकून टीका केली. ‘अणुकरारावर वाटाघाटींसाठी आमंत्रित करणार्‍या बायडेन प्रशासनाने इराणवर नवे निर्बंध लादून आपले पूर्णपणे दुटप्पी धोरण दाखवून दिले. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेच निर्बंधांचे धोरण कायम ठेवून बायडेन प्रशासनाने अमेरिकेवर विश्‍वास ठेवता येणार नसल्याचा संदेश दिला आहे’, असा जळजळीत शेरा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने मारला.

दरम्यान, गाझातील हमास, लेबेनॉनमधील हिजबुल्लाह, येमेनमधील हौथी तसेच इराक-सिरियातील दहशतवाद्यांना ड्रोन पुरविणार्‍या इराणकडून आपल्या हवाई सुरक्षेला धोका वाढत असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. यासाठी इस्रायल स्वतंत्र हवाई सुरक्षा यंत्रणा उभारत आहे. अशावेळी अमेरिकेने इराणच्या ड्रोन कमांडच्या प्रमुखांवर निर्बंध लादून कडक संदेश दिला आहे. इराणबरोबरील वाटाघाटींसाठी खुली असलेली खिडकी बंद होऊ शकते, असा इशारा अमेरिकेचे इराणविषयक विशेषदूत रॉबर्ट मॅली यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता.

leave a reply