पाकिस्तानकडून बांगलादेशात भारताच्या विरोधात जहरी अपप्रचार

- बांगलादेशी पत्रकारांनीच पर्दाफाश केला

ढाका – ‘बांगलादेशचे संस्थापक असलेले शेख मुजिबुर रेहमान पाकिस्तानी राष्ट्रवादी होते. पण त्या काळी पाकिस्तानात निर्माण झालेल्या राजकीय अस्थैर्य आणि विसंवादाचा फायदा भारताने घेतला. यामुळे बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला`, असा प्रचार बांगलादेशच्या माध्यमांमध्ये केला जात आहे. असा जहरी अपप्रचार करून बांगलादेशी जनतेमध्ये भारताच्या विरोधात विद्वेष पसरविण्याचे काम पाकिस्तान करीत आहे, असा आरोप बांगलादेशचे ख्यातनाम पत्रकार साजिद युसूफ शहा यांनी केला.

पाकिस्तानकडून बांगलादेशात भारताच्या विरोधात जहरी अपप्रचार - बांगलादेशी पत्रकारांनीच पर्दाफाश केलाबांगलादेशच्या स्थापनेचे हे 50 वे वर्ष असून बांगलादेशासह भारतातही याचा जल्लोष केला जात आहे. त्याचवेळी पाकिस्तानात हे वर्ष राष्ट्रीय शोकाचा काळ ठरला आहे. 1971 सालच्या युद्धात पाकिस्तान पराभूत झाला खरा. पण अजूनही या पराजयाचे विजयात रुपांतर करण्याचे प्रयत्न या देशाने सोडून दिलेले नाही. सध्या बांगलादेशात पाकिस्तान राबवित असलेल्या विषारी प्रचारमोहीमेतून हेच सिद्ध होत आहे. यासाठी पाकिस्तानने गेल्या वर्षापासूनच तयारी केल्याची माहिती साजिद युसूफ शहा यांनी दिली.

गेल्या वर्षीच्या 9 नोव्हेंबर रोजी, लाहोरमध्ये पाक-बांगलादेश फ्रेंडशिप कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पाकिस्तानातील बंगालींना विशेष आमंत्रण देण्यात आले. आत्तापर्यंत पाकिस्तानचे नेते, लष्करी अधिकारी, माध्यमे तसेच विश्‍लेषक देखील बांगलादेशचे संस्थापक वंगबंधू मुजिबुर रेहमान यांचा उल्लेख गद्दार असाच करीत होते. याबरोबरच मुजिबुर रेहमान भारताचे हस्तक असल्याचा आरोप आजही पाकिस्तानात केला जातो. पण पाक-बांगलादेश फ्रेंडशिप कॉन्फरन्समध्ये मुजिबुर रेहमान यांच्यावर अशी टीका करण्याचे टाळून ते पाकिस्तानवर प्रेम करणारे राष्ट्रवादी नेते होते, असा दावा आयोजकांनी केला.

मुजिबुर रेहमान यांना पाकिस्तानपासून स्वतंत्र होऊन बांगलादेशाची निर्मिती करायचीच नव्हती. पण त्या काळात पश्‍चिम आणि पूर्व पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय विसंवादाचा लाभ भारताने घेतला आणि बांगलादेश तयार झाला. बांगलादेशमध्ये पाकिस्तानवाद्यांची कत्तल झाली, त्याला बंडखोर व भारतीय लष्कर जबाबदार असल्याचा ठपका या परिषदेत ठेवण्यात आला होता. प्रत्यक्षात पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारामुळे भडकलेल्या बांगलादेशींपासून पाकिस्तानी लष्कराच्या अधिकारी व जवानांना भारतीय सैन्यानेच सुरक्षित ठेवले होते. याकडे दुर्लक्ष करून लाहोरमधील या परिषदेत खोडसाळ माहिती देण्यात आली.

या परिषदेनंतर बांगलादेशासाठी पाकिस्तानात अत्यंत प्रेमाची भावना असल्याचे दाखविण्याचे प्रयत्न झाले. ‘बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना पाकिस्तानबरोबर चांगले संबंध हवे आहेत. पण त्यांच्या सरकारमधील भारताचे एजंट त्यांना तसे करू देत नाहीत`, असे दावे ठोकण्यापर्यंत पाकिस्तानातील काहीजणांची मजल गेल्याचे साजिद युसूफ शहा यांनी म्हटले आहे. तसेच पाकिस्तान व बांगलादेश हे प्रमुख इस्लामधर्मिय देश असून हे देश एकत्र येऊन ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन-ओआयसी`चे व इस्लामी देशांचे नेतृत्त्व करू शकतात. बांगलादेश क्षेत्रिय आण्विक शक्ती बनावा यासाठी पाकिस्तान सहाय्य करू शकतो, पण भारत त्याला कधीही मान्यता देणार नाही, असे दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. त्याला काही बांगलादेशी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत, ही चिंतेची बाब ठरते, असे साजिद शहा पुढे म्हणाले.

2 जानेवारी रोजीच पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा एकदा पाक-बांगलादेश फ्रेंडशिप कॉन्फरन्सचे आयोजन केले जात आहे. त्याचे औचित्य साधून साजिद शहा यांनी आपल्या देशबांधवांना पाकिस्तानच्या या कारस्थानांपासून सावध केल्याचे दिसते. बांगलादेशातील काही कट्टरपंथिय अजूनही पाकिस्तानच्या बाजूने असून त्यांच्यापासून बांगलादेशाला फार मोठा धोका संभवतो. पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआय बांगलादेशात अस्थैर्य माजवित असल्याचा आरोप पंतप्रधान शेख हसिना यांनी गेल्याच महिन्यात केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर, बांगलादेशच्या पत्रकारांनी पाकिस्तानच्या कारस्थानांचा पर्दाफाश केल्याचे दिसते.

पंतप्रधान शेख हसिना यांचे सरकार सत्तेवर येऊ नये, यासाठी आयएसआयने याआधीही भयंकर कारस्थाने आखली होती. इतकेच नाही तर शेख हसिना यांचे सरकार उलथण्यासाठीही आयएसआयने कट आखले होते. ही कारस्थाने उधळली गेल्यानंतर, पाकिस्तानने आपले डावपेच बदलले असून भारताविरोधात जहरी प्रचार सुरू केला आहे. याला फार मोठे यश मिळण्याची शक्यता सध्या तरी दृष्टीपथात नसली तरी बांगलादेशसह भारताने पाकिस्तानच्या या कारस्थानांपासून सावध राहण्याची आवश्‍यकता आहे.

leave a reply