राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून निर्वासितांना रोखण्यासाठी ट्रम्प यांचे ‘रिमेन इन मेक्सिको’ धोरण पुन्हा लागू

‘रिमेन इन मेक्सिको’वॉशिंग्टन – राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देशात घुसणार्‍या अवैध निर्वासितांना रोखण्यासाठी तयार केलेले ‘रिमेन इन मेक्सिको’ धोरण पुन्हा लागू करणे भाग पडले आहे. गेल्या आठवड्यात यासंदर्भात मेक्सिको सरकारशी करार करण्यात आला आहे. सोमवारपासून ‘रिमेन इन मेक्सिको’ची पुन्हा अंमलबजावणी सुरू झाल्याचे ‘डिपार्टमेंट ऑफ होमलॅण्ड सिक्युरिटी’कडून सांगण्यात आले. बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांची धोरणे रद्द करण्याचा सपाटा लावला होता. पण न्यायालयाने दिलेल्या दणक्यानंतर बेकायदा निर्वासितांच्या मुद्यावर माघार घेणे बायडेन प्रशासनाला भाग पडले आहे.

गेल्या काही महिन्यात अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने सुमारे दीड लाखांहून अधिक अवैध निर्वासितांना देशात मोकळे सोडून दिल्याचे उघड झाले होते. त्यामुळे अमेरिका-मेक्सिको सीमेवर असलेल्या टेक्सास व फ्लोरिडा यासारख्या प्रांतांमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. काही भागांमध्ये ‘रिमेन इन मेक्सिको’अतिरिक्त सुरक्षादले तैनात करणेही भाग पडले होते. परिस्थिती अधिकाधिक बिघडत चालल्याने अमेरिकी जनतेतील नाराजीही वाढत चालली होती. बायडेन यांच्या निर्णयांविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या होत्या. अशाच याचिकांवर झालेल्या सुनावणीत टेक्सासमधील न्यायालयाने बायडेन प्रशासनाला फटकारत ‘रिमेन इन मेक्सिको’ धोरणाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले होते.

न्यायालयाच्या आदेशामुळे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना मेक्सिको सरकारशी करार करणेही भाग पडले होते. या आठवड्यापासून ‘रिमेन इन मेक्सिको’ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बायडेन यांच्या या निर्णयावर डेमोक्रॅट पक्ष तसेच स्वयंसेवी गटांकडून तीव्र नाराजीची प्रतिक्रिया उमटली आहे. ‘रिमेन इन मेक्सिको’ धोरण अमानवी असून आंतरराष्ट्रीय निकषांमध्ये बसणारे नाही, असा दावा स्वयंसेवी गटांकडून करण्यात येत आहे. तर डेमोक्रॅट पक्षाच्या समर्थकांनी बायडेन यांच्यावर अपेक्षाभंगाचा ठपका ठेवला आहे.

‘रिमेन इन मेक्सिको’माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेत आलेल्या तसेच घुसखोरी करणार्‍या निर्वासितांविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली होती. मेक्सिको सीमेवरून घुसखोरी करणार्‍या निर्वासितांना रोखण्यासाठी ‘मेक्सिको वॉल’च्या उभारणीबरोबरच ‘रिमेन इन मेक्सिको’सारखे धोरणही राबविले होते. त्यात मेक्सिकोतून अमेरिकेत येणार्‍या निर्वासितांची प्राथमिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना मेक्सिकोतच ठेवण्याच्या तरतुदीचा समावेश होता. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे सीमेवरून घुसखोरी करणार्‍या निर्वासितांच्या संख्येत मोठी घट दिसून आली होती.

मात्र बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर एकापाठोपाठ बेकायदा निर्वासितांना मोकळीक देणारे निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. ट्रम्प यांचे निर्वासितांसंदर्भातील धोरण अमेरिकेला काळिमा फासणारे होते असा ठपकाही बायडेन यांनी ठेवला होता. अमेरिकेत राहणार्‍या एक कोटींहून अधिक बेकायदा निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी नवे विधेयकही बायडेन प्रशासनाने संसदेत सादर केले होते.

leave a reply