चिनी जनतेचा असंतोष दडपण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग तैवानवर हल्ला चढवतील

- ब्रिटीश वर्तमानपत्राचा दावा

लंडन – कोरोनाव्हायरसचा उद्रेक, मंदावलेला विकासदर आणि बळावत चाललेले ऊर्जासंकट, यामुळे चीनच्या जनतेमध्ये राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याविरोधातील असंतोष वाढत चालला आहे. याकडून चिनी जनतेचे लक्ष वळविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग, २०१४ साली रशियन राष्ट्राध्यक्षांनी वापरलेल्या क्रिमिआ मॉडेलप्रमाणे तैवानवर हल्ला चढवू शकतात, असा दावा ब्रिटनच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये चीनच्या १५० लढाऊ विमानांनी तैवानच्या हद्दीत केलेली घुसखोरी व त्यानंतर जिनपिंग यांनी दिलेल्या धमकीतून चीनचे इरादे उघड होत आहेत.

२०१४ सालात रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची देशांतर्गत लोकप्रियता आटली होती. अशावेळी रशियन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनमधील विघटनवाद्यांना लष्करी सहाय्य पुरवून क्रिमिआला रशियामध्ये विलिन करून घेतले होते. यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची रशियातील लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. पुढील दहा वर्षे तरी पुतिन यांच्या नेतृत्वाला आव्हान मिळणार नसल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता.

चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग देखील सध्या देशांतर्गत असंतोषाला सामोरे जात आहेत. कोरोनाच्या उद्रेकामुळे चीनची जनता तसेच कम्युनिस्ट पार्टीतील काही नेते जिनपिंग यांच्या नेतृत्वावर नाराज आहेत. जिनपिंग यांच्या आर्थिक धोरणाचे फटके चीनच्या अर्थव्यवस्थेला बसत आहेत. जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी चीनने आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांचा गैरवापर केल्याचेही उघड झाले आहे. या धडपडीनंतरही आंतरराष्ट्रीय कंपन्या चीनकडे पाठ फिरवित आहेत. परदेशी कंपन्यांनी आपले कारखाने इतर देशांमध्ये हलविल्यामुळे चीनच्या जनतेवर बेरोजगारीचे संकट कोसळत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत. याचा नकारात्मक परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे.

अशा परिस्थितीत, देशांतर्गत असंतोष शमविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग तैवानवर हल्ला चढवून त्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतील, असा दावा ब्रिटनच्या वर्तमानपत्राने केला. तियानमेन गेटवरील माओ झेदॉंगच्या जागी आपली तसबीर लागावी, अशी जिनपिंग यांची महत्त्वाकांक्षा आहे. तैवानचे चीनमध्ये विलिनीकरण झाल्यानंतर आपली देखील लोकप्रियता वाढेल, असे जिनपिंग यांना वाटत आहे.

रशियाने क्रिमिआचा ताबा घेतला तितकेच तैवानचा ताबा घेण आपल्यासाठी सोपे जाईल, असे चीनच्या राष्ट्राध्यक्षांना वाटत आहे. कारण जगातील आघाडीच्या देशांनी चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’चा आदर करून तैवानला मान्यता देण्याचे टाळले आहे. त्यामुळे तैवानचा घास गिळणे सोपे असेल, अशी जिनपिंग यांची समजूत झालेली आहे. म्हणूनच तैवानला चीनपासून असलेला धोका वाढत असल्याचा इशारा ब्रिटनच्या या वर्तमानपत्राने दिला.

leave a reply