कॅनडातील ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ रोखण्यासाठी पंतप्रधानांकडून ‘इमर्जन्सीज् ऍक्ट’ची घोषणा

‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ओटावा – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्य्रुड्यू यांनी ट्रकचालकांचे ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ आंदोलन रोखण्यासाठी आणीबाणी लागू करीत असल्याची घोषणा केली आहे. कॅनडातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी व रोजगार वाचविण्यासाठी आणीबाणीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून मर्यादित काळासाठीच कायदा लागू असेल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. मात्र पंतप्रधानांच्या या कारवाईला कॅनडातील काही प्रांतांसह स्वयंसेवी संघटनांनी तीव्र विरोध केला. ही समस्या सोडविण्यााठी हा योग्य मार्ग ठरत नाही, असे टीकास्त्र या संघटनांनी सोडले आहे.

गेल्या महिन्याच्या अखेरपासून कॅनडात ट्रकचालकांचे ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ आंदोलन सुरू आहे. कॅनडा सरकारने कोरोनासंदर्भात केलेल्या नव्या नियमांविरोधात सुरू झालेल्या या आंदोलनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. अमेरिका व युरोपमध्येही याच धर्तीवर आंदोलने सुरू झाली आहेत. कॅनडातील आंदोलन शांततापूर्ण रितीने चालू असतानाही, ट्यु्रड्यू सरकार ते चिरडण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून आंदोलकांविरोधात अतिरिक्त पोलीसबळाचा वापर सुरू होता. मात्र त्यानंतरही आंदोलकांनी माघार घेण्यास नकार दिला.

‘फ्रीडम कॉन्व्हॉय’त्यामुळे पंतप्रधान ट्य्रुड्यू यांनी टोकाचे पाऊल उचलत थेट ‘इमर्जन्सीज् ऍक्ट’ लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. यापूर्वी त्यांनी आंदोलनकर्त्यांची संभावना ‘छोटा उपद्रवी गट’ अशा शब्दात केली होती. हा गट कॅनेडियन जनतेच्या सुरक्षेला धोका उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दावेही त्यांच्याकडून करण्यात आले होते. आता आणीबाणीच्या कायद्यानुसार मिळणारे अधिकार वापरून आंदोलन दडपण्यासाठी पंतप्रधान ट्य्रुड्यू यांनी प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. पण त्यांच्या या निर्णयाला विरोध होत आहे.

‘फ्रीडम कॉन्व्हॉय’कॅनडातील अल्बर्टा व क्युबेकसह चार राज्यांनी ‘इमर्जन्सीज् ऍक्ट’च्या अंमलबजावणीला नकार दिला आहे. ‘कॅनेडियन सिव्हिल लिबर्टीज् असोसिएशन’ या आघाडीच्या स्वयंसेवी गटानेही पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले आहे. कायदा लागू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी योग्य निकषांचे पालन केले नसल्याचा आरोप या गटाने केला. अमेरिकेतील ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील सूत्रसंचालक टकर कार्लसन यांनी, पंतप्रधान ट्य्रुड्यू यांनी कॅनडातील लोकशाही निलंबित करून हुकुमशाही लागू केली आहे, या शब्दात कोरडे ओढले आहेत. यापूर्वी १९७० साली जस्टिन ट्य्रुड्यू यांचे वडील व तत्कालिन पंतप्रधान पिएरे ट्य्रुड्यू यांनी क्युबेक राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या कायद्याचा वापर केला होता.

दरम्यान, सोमवारी कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतातील सुरक्षायंत्रणांनी ‘फ्रीडम कॉन्व्हॉय’ आंदोलकांकडून शस्त्रसाठा जप्त केल्याची माहिती दिली आहे. यावेळी १३ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचेही सांगण्यात येते.

leave a reply