जर्मनीतील नैसर्गिक वायूचा साठा संपत चालला आहे

बर्लिन – जर्मनीमध्ये युरोपमधील नैसर्गिक वायूचा सर्वाधिक साठा करण्याची क्षमता आहे. तरीही जर्मनीकडील हा साठा संपत चालला असून या देशाकडे जेमतेम ३५ टक्के नैसर्गिक वायूचा साठा उरला आहे. युक्रेन-रशियामध्ये निर्माण झालेली युद्धसदृश्य परिस्थिती आणि नैसर्गिक वायूच्या दरातील वाढ यासाठी कारणीभूत असल्याचा दावा केला जातो. दरम्यान, जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ हे मंगळवारी रशियात दाखल झाले आहेत.

जर्मनीतील नैसर्गिक वायूचा साठा संपत चालला आहेजर्मनीच्या अर्थ विभागाच्या प्रतिनिधींनी सोमवारी माध्यमांशी बोलताना देशातील नैसर्गिक वायूच्या साठ्यात झालेल्या कपातीची माहिती उघड केली. जर्मन सरकार या परिस्थितीकडे बारकाईने पाहत असल्याचे सदर अधिकार्‍याने सांगितले. गेल्या कित्येक वर्षांमध्ये पहिल्यांदाच नैसर्गिक वायूच्या साठ्यात एवढी मोठी घट झाल्याचे पहायला मिळत असल्याची कबुली या अधिकार्‍याने दिली.

हिवाळ्यात नैसर्गिक वायूची वाढती मागणी लक्षात घेता जर्मन संसदेने देशातील इंधन कंपन्यांना नैसर्गिक वायूचा पर्याप्त साठा करून ठेवण्याची सूचना केली आहे. जर्मनीत येऊ घातलेल्या इंधन टंचाईचा अभ्यास करणार्‍या अधिकार्‍यांनी अमेरिकी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. जर्मन सरकारने नैसर्गिक वायूच्या साठ्यात झालेल्या या कपातीसाठी अद्याप कुणाला जबाबदार धरलेले नाही. पण गेल्या काही आठवड्यांपासून युक्रेन आणि रशियाच्या सीमेवर निर्माण झालेला लष्करी तणाव यासाठी कारणीभूत असल्याचा दावा केला जातो.

रशियाकडून युरोपिय देशांना सर्वाधिक प्रमाणात इंधनवायू पुरविला जातो. युक्रेनच्या सीमेतून पाईपलाईनमार्गे हा नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो. यातील मोठा हिस्सा जर्मनीकडून वापरला जातो. आपल्या देशातील याची मागणी लक्षात घेऊन जर्मनीने रशियाबरोबर ‘नॉर्ड स्ट्रिम २’ करार केला होता. पण रशिया या कराराचा शस्त्रासारखा वापर करीत असल्याची टीका युक्रेन करीत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांनी जर्मन चॅन्सेलर शोल्झ यांच्याबरोबरच्या चर्चेत हा आरोप केला होा.

leave a reply