वाहननिर्मिती कंपन्यांसाठी फ्लेक्स फ्युअल इंजिनाचे उत्पादन बंधनकारक करणार

- केंद्रीय परिवहन व महामार्गमंत्री गडकरी

मुंबई – देशातील वाहन कंपन्यांना फ्लेक्स-फ्युअल इंजिन बनविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यासाठी सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीची आपण वाट पाहत आहोत. फ्लेक्स फ्युअल इंजिन असलेल्या वाहनांमध्ये कोणत्याही इंधनाचा वापर करता येणार आहे. देशात इथेनॉल, मिथेनॉल आणि गॅसोलिन मिश्रीत इंधनाचा वापर वाढावा, यासाठी सुरू असलेल्या सरकारच्या प्रयत्नांचा हा भाग असल्याचे केंद्रीय परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

वाहननिर्मिती कंपन्यांसाठी फ्लेक्स फ्युअल इंजिनाचे उत्पादन बंधनकारक करणार- केंद्रीय परिवहन व महामार्गमंत्री गडकरीपीएचडीसीसी या उद्योगांच्या संघटनेने आयोजित केलेल्या वार्षिक कार्यक्रमात गडकरी बोलत होते. देशातील पेट्रोल व डिझेलची आयात कमी करून अर्थव्यवस्थेवरील भार कमी करणे, तसेच पर्यावरण पूरक इंधनाचा वापर वाढविणे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढविण्यात येत आहे. मात्र लिक्विफाईड नैसर्गिक वायू (एलएनजी), कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि इथेनॉलच्या मिश्र इंधनाचा वापर वाढावा, यावर सरकारचा भर आहे. सरकार काही महिन्यांपूर्वीच आपले इथेनॉल धोरण जाहीर केले होते. यामध्ये अतिरिक्त गहू, तांदूळ, साखर व इतर पिकांपासून इथेनॉलचे उत्पादन घेण्यात प्रोत्साहन देण्यात आले होते. तसेच सरकार ईलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढविण्यावरही भर देत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने आता वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्युअल इंजिन बंधनकारक करण्याची तयारी केली आहे.

फ्लेक्स फ्युअल इंजिनामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारच्या इंधनाचा वापर करता येतो. त्यामुळे मिश्र इंधनाचा वापर वाढविण्यासाठी असे इंजिन असलेल्या वाहनांची निर्मिती होणे आवश्यक आहे. ब्राझिल, कॅनडा, अमेरिकेतील बहुतांना वाहननिर्मिती कंपन्या फ्लेक्स फ्युअल इंजिनाचे उत्पादन घेत आहेत, याकडे याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने फ्लेक्स-फ्युअल इंजिनाच्या धोरणाबाबत शपथपत्र मागविले होते. सरकारने ते शपथपत्र सादर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली की सर्व वाहन उत्पादकांना फ्लेक्स-फ्युअल बंधनकारक करण्यात येईल, असे गडकरी म्हणाले. तसेच लष्करातही डिझेल इंजिन वाहनांना बंदी घालावी, त्याऐवजी एलएनजी, सीएनजी व इथेनॉलवर चालणारे ट्रक वापरावेत, असे आवाहनही गडकरी यांनी केले. या कार्यक्रमाला लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे उपस्थित होते.
सरकारने नवे इथेनॉल धोरण जाहीर केल्यावर देशभरात ४५० कारखान्यांनी इथेनॉलचे उत्पादन घेण्यासाठी स्वारस्य दाखविले आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. देशी इंधनाच्या वापरामुळे शेतकर्‍यांनाही मोठा लाभ मिळेल, तसेच भारतीय वाहन उद्योगालाही फायदा होईल, त्याचा विस्तार होऊन या क्षेत्रात अधिक रोजगार निर्माण होतील, असा दावा गडकरी यांनी केला.

leave a reply