इराणच्या राजवटीविरोधातील आंदोलन शाळा, कॉलेजपर्यंत पोहोचले

तेहरान – तिसऱ्या आठवड्यात पोहोचलेले हिजाबविरोधी आंदोलन इराणच्या शाळा, कॉलेजमध्ये पोहोचले आहे. हिजाबसक्तीसाठी शाळेत दाखल झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याला विद्यार्थीनींनी पिटाळून लावल्याचे आणि त्यानंतर हिजाब काढून फेकल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. इराणमधील शिक्षकांच्या संघटनेने हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. काही दिवसांपूर्वी इराणी सुरक्षा यंत्रणेने केलेल्या कारवाईत 17 वर्षांखालील दोन मुलींची निघृणरित्या हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर आंदोलनाचा हा भडका उडाला आहे. दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या आठवड्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी राजधानी तेहरानमधील शरिफ विद्यापीठात घुसून हिजाबविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थीनींवर कारवाई केली होती. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर इराणच्या शिक्षक तसेच विद्यार्थी गटांमध्ये इराणच्या राजवटविरोधातील संताप वाढला होता. त्यातच काही दिवसांपूर्वी इराणी सुरक्षा यंत्रणेने तेहरानमधील आंदोलनादरम्यान केलेल्या निर्दयी कारवाईच्या बातम्या उघड झाल्यानंतर या असंतोषाचा नवा भडका उडाला.

सोशल मीडियावरील प्रसिद्ध इराणी चेहरा असलेली 16 वर्षीय सरिना इस्माईलझादेह आणि 17 वर्षाची निका शाहकरमी या दोघीही हिजाबविरोधी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पण गेल्या दहा दिवसांपासून या दोघीही बेपत्ता होत्या. त्यांच्या पालकांनी शोध सुरू केल्यानंतर इराणच्या जवानांनी सरिनाचा मृतदेह तिच्या कुटुंबियांच्या हवाली केला. सरिनाच्या डोक्यावर बॅटनने जोरदार मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. तर निकाचा मृतदेह जवळच्याच शवागृहात सापडला. तिच्या कवटीला फ्रॅक्चर झाल्याचे आणि नाकाला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले.

याचे पडसाद इराणच्या शाळा व कॉलेजमध्ये उमटले. सोमवारी इराणच्या शाळेत हिजाबसक्तीची पाहणी करण्यासाठी दाखल झालेल्या सरकारी अधिकाऱ्याला विद्यार्थिनींनीच घेराव घातला. या विद्यार्थिनींनी सदर अधिकाऱ्याच्या तोंडावर सरकारविरोधी घोषणा दिल्याचे आणि त्यानंतर सदर अधिकाऱ्याला पळ काढण्यास भाग पाडल्याचे या व्हिडिओज्‌‍द्वारे प्रसिद्ध झाले आहे. त्याला इराणसह जगभरात मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. पुढच्या काही तासातच इराणच्या ‘कोऑर्डिनेशन काऊन्सिल ऑफ टिचर्स असोसिएशन’ या संघटनेने देशभरातील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.

इस्फाहन, केरमानशाह, मजदाद या व इतर शहरांमधील विद्यापीठांमधून याला पाठिंबा मिळत असल्याचे दावे केले जातात. ही घडामोड इराणमधील खामेनी यांच्या राजवटीसाठी आव्हान ठरत आहे. काही तासांपूर्वीच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी हे आंदोलन म्हणजे दंगल असल्याची टीका केली होती. तसेच अमेरिका व इस्रायल या दंगली भडकवित असल्याचा आरोप खामेनी यांनी केला होता. त्यापाठोपाठ मंगळवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी देशवासियांना एकजुटीचे आवाहन केले. त्याचबरोबर इराणच्या शत्रूंनी हे आंदोलन पेटविल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष रईसी यांनीही ठेवला आहे.

दरम्यान, या आंदोलकांवर कठोर कारवाई करणाऱ्या इराणच्या रईसी सरकारवर कॅनडाने निर्बंध जाहीर केले आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी लवकरच इराणला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला. युरोपिय देश देखील याप्रकरणी इराणवर निर्बंधांची कारवाई करू शकतात.

leave a reply