पीओकेमध्ये पाकिस्तानविरोधात निदर्शने तीव्र

इस्लामाबाद – अन्नधान्यांची टंचाई आणि कडाडलेल्या महागाईच्या विरोधात पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) आणि गिलगिट बाल्टिस्तानमधील जनतेचा उद्रेक झाला आहे. पाकिस्तानच्या सरकारविरोधात इथली जनता रस्त्यावर उतरली असून निदर्शकांनी पीओकेमधून जाणाऱ्या महामार्गाची वाहतूक रोखली. जनता उपाशीपोटी असताना, पीओकेमधील गव्हाची कोठारे पाकिस्तानच्या सरकारने लॉक करून ठेवल्याचा आरोप करून यामुळे इथली जनता भडकल्याचा दावा स्थानिक नेत्यांनी केला आहे.

pak gb protest‘पीओकेमध्ये एका दिवसात इथल्या गव्हाच्या दरात 1200 रुपयांची वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारने गव्हाचे पीठ असलेली कोठारे बंद करुन ठेवली आहेत. यामुळे पाकिस्तानच्या सरकारविरोधात संतापाचा भडका उडाला असून पीओकेमधले नागरिक व विद्यार्थी तसेच वकिल देखील रस्त्यावर उतरले आहेत. तसेच पाकिस्तानच्या सरकारने गिलगिट बाल्टिस्तानमधल्या जमिनी बळकाविल्या आहेत. याच्या विरोधात देखील जनता पेटून उठली असून ठिकठिकाणी पाकिस्तानच्या सरकारचा निषेध केला जात आहे.

त्यातच गिलगिट बाल्टिस्तानमध्ये दिवसातले 22 तास लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे इथले उद्योगव्यवसाय ठप्प झाले असून यानेही जनता संतापली आहे. इथल्या जनतेच्या अधिकारांसाठी पाकिस्तानच्या सरकारशी संघर्ष करीत असलेले कार्यकर्ते अमजद आयुब मिर्झा यांनी ही माहिती देऊन त्यावर चिंता व्यक्त केली आहे.

Protests against Pakistanगिलगिट बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानने ‘खालसा सरकार टॅक्स’ लागू केला आहे. या टॅक्सअंतर्गत गिलगिट बाल्टिस्तानमधील नापिक जमीनी आपोआप सरकारच्या ताब्यात जाणार आहे. याला देखील स्थानिकांचा कडवा विरोध असून आपल्या जमिनी बळकावणाऱ्या पाकिस्तानसोबत आम्हाला रहायचे नाही, आम्हाला भारतात सामील व्हायचे आहे, अशा घोषणा इथले निदर्शक देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या घोषणा इथे सातत्याने दिल्या जात असल्याने पाकिस्तानची अस्वस्थता वाढत चालली आहे.

बांगलादेश पाकिस्तानचाच भाग होता, पण तो कालांतराने आपल्यापासून वेगळा झाला. आत्ताही पाकिस्तानात तशीच परिस्थिती दिसू लागली आहे, अशी हताश प्रतिक्रिया पाकिस्तानचे विश्लेषक देऊ लागले आहेत. पीओके व गिलगिट बाल्टिस्तानमधील जनतेकडून पाकिस्तानला होत असलेला विरोध म्हणजे नव्या बांगलादेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे का, असा सवाल हे विश्लेषक पाकिस्तानच्या सरकारला विचारत आहेत.

leave a reply