फ्रान्समध्ये इराणच्या राजवटीविरोधात तीव्र निदर्शने

iran protest franceपॅरिस – इराणने ब्रिटीश नागरिक अलीरेझा अकबरी यांना दिलेल्या फाशीचे पडसाद युरोपिय देशांमध्ये उमटत आहेत. फ्रान्स व जर्मनीने इराणच्या राजदूतांना समन्स बजावले. तर फ्रान्सच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये इराणच्या राजवटीच्या विरोधात निदर्शने पार पडली. राजधानी पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर इराणच्या राजवटीचा निषेध नोंदविणारे व हिजाबसक्तीचा विरोध करणाऱ्या निदर्शकांचे समर्थन करणारे संदेश झळकविण्यात आले.

फ्रान्सची राजधानी पॅरिस तसेच स्ट्रासबोर्ग या शहरांमध्ये इराणच्या राजवटीच्या विरोधात जोरदार निदर्शने पार पडली. सुमारे पाच हजार जणांचा समावेश असलेल्या आयफेल टॉवरजवळील निदर्शनांनी साऱ्या जगाचे लक्ष खेचून घेतले. यावेळी इराणच्या राजवटीने निदर्शकांना फाशी देऊ नका, असे आवाहन करण्यात आले. तसेच इराणच्या राजवटीचा धिक्कार करण्यात आला. फ्रान्समध्ये स्थायिक असलेल्या इराणवंशिय नागरिकांनी या निदर्शनांचे आयोजन केले होते.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इराणमध्ये खामेनी राजवटीच्या विरोधात निदर्शने सुरू झाल्यापासून जगभरातून त्यांचे समर्थन केले जात आहे. अमेरिका तसेच युरोपिय देशांमध्ये इराणवंशिय मोठ्या संख्येने एकत्र येऊन इराणमध्ये निदर्शकांवर होणाऱ्या कारवाईकडे जगाचे लक्ष खेचून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण गेल्या आठवड्यात इराणमध्ये घडलेल्या एका घटनेने युरोपिय देशांना हारवून सोडले आहे. इराणने माजी उपसंरक्षणमंत्री अलीरेझा अकबरी यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना फाशी दिली.

अलीरेझा यांच्याकडे इराण आणि ब्रिटन असे दुहेरी नागरिकत्व होते. त्यामुळे त्यांना फाशी देऊन इराणने ब्रिटनसह युरोपिय देशांना इशारा दिल्याचा दावा केला जात होता. अलीरेझा यांना दिलेल्या फाशीनंतर ब्रिटनने इराणमधील दुहेरी नागरिकत्व असलेल्या ब्रिटीश नागरिकांना ताबडतोब इराण सोडण्याची सूचना केली होती. गेल्या चार महिन्यांमध्ये इराणच्या राजवटीने 40 हून अधिक परदेशी नागरिकांना अटक केली असून यामध्ये ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीच्या नागरिकांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. इराणच्या सुरक्षा यंत्रणेने चोवीस तासांपूर्वीच एका फ्रेंच नागरिकाला अटक केल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे.

leave a reply