‘झीरो कोविड पॉलिसी’विरोधात चीनमधील निदर्शने सुरूच

बीजिंग – चीनच्या जनतेने दाखविलेल्या उद्रेकासमोर माघार घेत, कम्युनिस्ट राजवटीने झीरो कोविड पॉलिसीबाबतचे नियम शिथिल करण्याचे जाहीर केले. पण कम्युनिस्ट राजवटीने झीरो कोविड पॉलिसीवर टीका करणाऱ्यांना लक्ष्य करणे सुरू ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा बास्केटबॉलपटू लीन याच्यावरही चीनने कारवाई केल्याचे समोर येत आहे. तर लाँझाऊ येथे संतप्त चिनी जमावाने विलगीकरण केंद्राची नासधूस करून पेटवून दिल्याची घटना समोर येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या १५ हून अधिक शहरांमध्ये झीरो कोविड पॉलिसीच्या विरोधात वाढत असलेल्या संतापाचा उद्रेक झाल्यानंतर चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने सदर धोरण शिथिल केले. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे सरकार चीनच्या जनतेसमोर झुकली, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण जिनपिंग यांच्या सरकारने नरमाई दाखविली असली तरी आपल्या विरोधकांवरील कारवाई अजिबात थांबविलेली नाही. चीनच्या सुरक्षा यंत्रणा निदर्शकांवर कारवाई करण्यासाठी सज्ज असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. सोशल मीडिया व सीसीटीव्हीचा वापर करून निदर्शकांवर कारवाई सुरू झाल्याचा दावा केला जातो.

चीनच्या सुरक्षा यंत्रणा संशयितांचे ओळखपत्र तपासणे, मोबाईलफोन्स जप्त करून त्याची पाहणी करीत असल्याची माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी चिनी पोलिसांची मोठ्या प्रमाणात तैनाती करण्यात आली असून येत्या काळात निदर्शकांवर जोरदार कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे.

leave a reply