चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाविरोधात नेपाळमध्ये निदर्शने

नवी दिल्ली – नेपाळमध्ये अंतर्गतबाबीत चीनचा हस्तक्षेप वाढत असून पंतप्रधान के.पी. शर्मा यांची खुर्ची वाचविण्यासाठी नेपाळमधील चीनच्या राजदूत प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या आहेत. चीनच्या राजदूत होउ यांकी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या गेल्या तीन दिवसापासून भेटीगाठी घेत आहेत. चीनचा हा वाढता हस्तक्षेप नेपाळचा विरोधीपक्ष आणि जनतेला रुचलेला नाही. याचा निषेध नोंदविण्यासाठी काठमांडू येथील चीनच्या दूतावासाबाहेर निदर्शने झाली. त्याचवेळी नेपाळच्या नव्या नकाशावर आक्षेप घेणाऱ्या नेपाळच्या खासदार सरिता गिरी यांनी वेळीच सावध झालो नाही, तर नेपाळचा नॉर्थ कोरिया होईल, असा इशारा नेपाळच्या राज्यकर्त्यांना दिला आहे.

China-Nepal-Protestनेपाळमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षांमध्ये दुफळी माजली आहे. पंतप्रधान ओली यांच्या बेताल कारभारावर कम्युनिस्ट पक्षांचे वरिष्ठ नेते नाराज असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. मात्र कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीच्या ज्या बैठकीत ओली यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणार होता, तीच बैठक शनिवारपासून तीनवेळा पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक पुढे ढकलण्यात येत असल्यामागे नेपाळच्या चीनच्या राजदूत होउ यांकी असल्याचे सांगितले जाते. राजदूत यांकी यांनी ओली यांच्याविरोधात आघाडी उघडणाऱ्या माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल (प्रचंड), माधव कुमार नेपाळ, झाला नाथ खानल यांच्यासारख्या नेत्यांच्या भेटी गेल्या तीन दिवसात घेतल्या आहेत.

याआधी तीन महिन्यापूर्वीही ओली यांच्यावर राजीनाम्याचे दडपण वाढले होते. त्यावेळी अशाच प्रकारे नेपाळमधील चिनी दूतावासातून हालचाली झाल्या होत्या. राजदूत होउ यांकी सक्रिय झाल्या होत्या. त्यानंतर काही दिवसातच नेपाळच्या पंतप्रधानांनी भारताबरोबर सीमावाद उकरून काढला होता. आताही चीनच्या राजदूत सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे. सध्या ओली यांच्यावरील संकट टाळण्यासाठी होउ यांकी ज्या पद्धतीने सक्रिय झाल्या आहेत, याची चर्चा नेपाळी माध्यमांमधूनही होऊ लागली आहे. तसेच विरोधी पक्षही यावर टीका करीत आहे.

मंगळवारी चीनच्या राजदूत हाउ यांकी यांच्या विरोधात नेपाळमधील चीनच्या दूतावासाबाहेर शेकडोंच्या संख्येने जमलेल्या जमावाने निदर्शने केली. यामध्ये विरोधी पक्षाच्या नेपाळी कॉंग्रेसची विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. या मोर्चांमध्ये निदर्शकांनी चीन विरोधी फलक घेतले होते. ‘चिनी राजदूतांनी आपल्या दूतावासातच थांबावे’, ‘गो बॅक चायना’, नो इंटरफेरन्स’, असे फलक यावेळी निदर्शकांनी घेतले होते. तसेच काही निदर्शकांनी हाउ यांकी यांच्या फोटोवर काट मारलेले फलक झळकावून आपला विरोध प्रदर्शित केला.

China-Nepal-Protestसत्ताधारी पक्षाच्या अंतर्गत प्रश्नात परकीय देशाच्या अधिकाऱ्याने ढवळाढवळ करणे ही बाब नेपाळच्या विरोधी पक्षांना खटकलेली आहे. चिनी राजदूतांची नेपाळच्या अंतर्गत राजकारणातली लुडबुड पाहूनच नेपाळमधल्या विरोधी पक्षनेत्यांनी कठोर शब्दात टीका केली आहे. तसेच ओली सरकार यांच्या अपरिपक्व परराष्ट्र धोरणांची निंदा केली असून यामुळे शेजारी देशांबरोबरील संबंधावर परिणाम झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारी नेपाळच्या समाजवादी पक्षाने त्यांच्या पक्षाच्या खासदार सरिता गिरी यांना पक्षातून आणि पदावरून हटविले होते. तसेच त्यांची संसदेची सदस्यता ही रद्द करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी नेपाळच्या संसदेत भारताचा भूभाग नेपाळमध्ये दाखविणारा नकाशा संसदेत मंजूर होत असताना, गिरी यांनी याचा विरोध केला होता. नेपाळकडे कोणतेही ऐतिहासिक पुरावे नसल्याचे त्यांनी नेपाळच्या संसदेतच सांगितले होते. बुधवारी एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत नेपाळमध्ये आपण वारंवार चीनच्या हस्तक्षेपाविरोधात प्रश्न विचारल्याने आपल्यावर कारवाई झाल्याचे गिरी म्हणाल्या. तसेच नेपाळ वेळीच सावध झाला नाही, तर नेपाळचा उत्तर कोरिया करण्याचा चीनचा डाव यशस्वी ठरेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

leave a reply